भाजपाध्यक्षांनी अगोदर पक्षाचा नीट अभ्यास करावा
मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक सुभाष वेलिंगकर यांचा सल्ला
पणजी : भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक यांनी मराठी राजभाषा निर्धार समितीच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर केलेले ‘राजभाषेचा प्रश्न संपलेला आहे’ हे विधान म्हणजे गेल्या 40 वर्षांपासून मराठी राजभाषेसाठी अव्याहतपणे चळवळ करणाऱ्या प्रामाणिक प्रयत्नांची खिल्ली उडवणारे, गोव्यातील तमाम मराठीप्रेमींच्या भळभळणाऱ्या जखमेवर मीठ चोळणारे आणि आपणच सत्तेवर येण्यापूर्वी घेतलेल्या भूमिकेशी प्रतारणा करणारे आहे. मराठी राजभाषा निर्धार समिती या विधानाला तीव्र आक्षेप घेत असून, विधानाचा तीव्र निषेधही करत आहे, असे मराठी राजभाषा निर्धार समिती, गोवाचे निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी म्हटले आहे.
वेलिंगकर यांनी पुढे म्हटले आहे की अशी संदर्भहीन विधाने करण्यापूर्वी भाजपाध्धक्षांनी एकदा त्यांच्याच पक्षाने मराठी राजभाषेच्या मागणीसाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व स्व. मनोहर पर्रिकर यांनी (राजभाषा कायदा संमत झाल्यानंतर) केलेली भाषणे, पक्षाने आपल्या अधिवेशनात माजी अध्यक्ष लालकृष्ण अडवानींच्या उपस्थितीत श्रीदेव बोडगेश्वराच्या प्रांगणातील विराट अधिवेशनात घेतलेले ठराव, आमदार नरेश सावळ यांनी स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना, 2016 साली मांडलेल्या मराठीला राजभाषा करण्याच्या खाजगी ठरावाला सत्ताधारी भाजपाचे आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी दिलेले समर्थन व सुचवलेल्या दुऊस्तीसह संमत करण्यात आलेला ठराव हे दामू नाईक यांनी लक्षात घ्यायला हवे.
पक्षाध्यक्षांनी नीट अभ्यास करावा
भाजपाने सर्व स्तरांवर मराठी राजभाषा मागणीसाठी दिलेले समर्थन आणि या शीर्षस्थ नेत्यांनी व भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने, स्व. मनोहर पर्रिकर यांनी स्वत: गोवा विधानसभेत 2000 साली मांडलेले मराठी राजभाषा विधेयक, भाजपाने सर्व स्तरांवर मराठी राजभाषा मागणीसाठी दिलेले समर्थन आणि या शीर्षस्थ नेत्यांनी, भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेली आश्वासने, अशा प्रकारे भाजपाने राजभाषा कायदा संमत झाल्यानंतर केलेल्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भांचा पक्षाध्यक्षांनी एकदा नीट अभ्यास करावा, आणि नंतरच बेपर्वाईची गरज असली तर अशी विधाने करावी, असा सल्लाही वेलिंगकर यांनी दिला आहे. भाजपाने वर उल्लेख केलेल्या गोष्टी मराठीवर झालेला अन्याय दूर करण्यासाठीच जर केलेल्या असतील तर त्या गोष्टींना प्रामाणिकपणे जागावे. अभिजात मराठीला राजभाषेचा दर्जा देणे ही भारतीय जनता पार्टीची नैतिक बांधिलकी आहे आणि नैतिक कर्तव्यही आहे, हे लक्षात कायम असू द्यावे. नपेक्षा कर्तव्यपूर्तीसाठी मराठीप्रेमी जनता सिद्ध होतेच आहे, असेही वेलिंगकर यांनी म्हटले आहे.