यंदा भाजप 370, रालोआ 400 पार! पंतप्रधान मोदींचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल
राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा घणाघात, विरोधी पक्षांवर हल्लाबोल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या 10 वर्षांच्या शासनकाळात देशाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. या प्रगतीची फळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये पोहचविण्यात आम्ही यशस्वी ठरले आहोत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 370 हून अधिक, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 400 हून अधिक जागांवर विजय मिळेल, असे आत्मविश्वासपूर्वक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केले आहे.
ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणासंबंधीच्या आभार प्रदर्शन प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देत होते. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या 10 वर्षांच्या सत्ताकाळात देशाने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या देदिप्यमान प्रगतीचा सविस्तर आढावा त्यांनी आपल्या भाषणात घेतला आहे. तसेच विरोधी पक्षांवरही कडाडून टीका त्यांनी केली. विशेषत: काँग्रेसला त्यांनी मोठ्या प्रमाणात लक्ष्य केल्याचे दिसून आले. काँग्रेस हा योग्य विरोधी पक्षही होऊ शकला नाही. त्याची नकारात्मक वृत्ती आजही तशीच आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
देशाची सर्वांगीण प्रगती
भारतीय जनता पक्ष आणि रालोआच्या 10 वर्षांच्या शासन काळात आम्ही 25 कोटी गरीबांना गरीबी रेषेच्या बाहेर काढले आहे. देशातील 80 कोटी नागरीकांना विनामूल्य धान्य देण्याची सोय केली आहे. ग्रामीण भागांमधील गरीबांसाठी 4 कोटी घरांचे, तसेच शहरी भागांमधील गरीब आणि निम्नमध्यमवर्गियांसाठी 80 लाख घरांचे निर्माणकार्य केले आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर मार्गनिर्माण, पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बंदरे, जलमार्ग, विमानतळ, महाविद्यालये, शाळा, आरोग्यकेंद्रे आणि रुगालये जनतेच्या सेवेसाठी निर्माण केली. आयुष्यमान कार्यक्रमांतर्गत कोट्यावधी गरीबांना अत्यल्प खर्चात आधुनिक उपचार मिळण्याची सुविधा दिली. 19 कोटी कुटुंबांना विनामूल्य गॅस कनेक्शन आणि इतर अनेक सुविधा दिल्या आहेत. पूर्वी कधीही नव्हता इतक्या वेगाने आम्ही कामे आणि योजना पूर्णत्वास नेल्या. त्यामुळे लोकांचा विश्वास मिळविल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
संरक्षण आणि संसाधनांमध्ये अव्वल
संरक्षण क्षेत्रात पूर्वी कधी नव्हती इतका भक्कमपणा आम्ही आणला आहे. आज भारतात युद्धविमानांची निर्मिती होत असून शस्त्र निर्यातही आम्ही मोठ्या प्रमाणात करीत आहोत. देशाच्या सीमा आम्ही उत्तमरित्या सुरक्षित केल्या आहेत. दहशतवाद, नक्षलवाद आणि देशांतर्गत समाजविघातक शक्तींना प्रतिबंध करण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा आमचा निर्धार आहे. या क्षेत्रासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात साधने उपलब्ध करुन दिल्याने ही कामगिरी साध्य झालेली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नेहरुंच्या चुकांचा आजही परिणाम
काश्मीरची समस्या पूर्णत: नेहरुंमुळे निर्माण झाली आहे. त्याचवेळी योग्य तो निर्धार दाखविला असता तर ही समस्या निर्माणच झाली नसती. पण अर्धवट धोरण धरल्याने त्यानंतरच्या कित्येक पिढ्यांना त्यांच्या चुकांचे परिणाम भोगावे लागत आहेत. अक्षम्य चुका करुन ते निघून गेले पण त्यांचे विपरीत परिणाम आजही देशाची हानी करत आहेत, ही बाब पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अधोरेखित केली.
आमच्या काळात महागाई नियंत्रणात
आमच्या सरकारच्या काळात महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याचा अपप्रचार विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतो. असे करुन जनतेची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तथापि, आकडेवारी हे सांगते की काँग्रेसच्या सत्ताकाळात महागाई वाढीचा दर 8 ते 10 टक्के असा सातत्याने राहिला आहे. पण आमच्या काळात तो सरासरी 5 टक्क्यांहूनही कमी आहे. त्यामुळे महागाईला आम्ही उत्तरदायी आहोत हा विरोधकांचा प्रचार निरर्थक असून, उलट आम्ही सर्व प्रकारच्या आव्हांनाना तोंड देऊन महागाई नियंत्रणात ठेवली आहे. जनतेलाही याची पूर्णत: जाणीव आहे, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.