भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स खातं उघडलयं...राज ठाकरेंचा भाजपला टोला
भाजपने आपल्या कार्यकाळात काय कामे केली आहेत ती सर्वांना सांगावित. रामलल्लाच्या दर्शनाचे आमिष लोकांना कशाला दाखवता. भाजपने आता टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपनीचं खातं उघडले आहे का ? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. काही दिवसापुर्वी भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेश मधील प्रचारा दरम्यान केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कालच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी मध्य प्रदेशच्या गुणा जिल्ह्यातील राघोगढ येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना जनसमुदायाला निवडून देण्याचे आव्हान केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, "तुम्ही ३ डिसेंबरला भाजपचे सरकार आणा, तुम्हाला रामलल्लाचे मोफत दर्शन घडवण्यात येईल. त्याचा खर्च भाजप सरकार करेल." अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे. अमित शहा यांच्या या विधानानंतर अनेक भाजप विरोधी राजकिय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या विधानावर प्रश्न उपस्थित केले. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही फक्त मध्य प्रदेशालाच का ? असा प्रश्न उपस्थित करून सगळ्यांनाच रामलल्लाचं दर्शन घडवलं पाहीजे अशी मागणी केली.
आज मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी सद्याच्या राजकिय वातावरणावर भाष्य़ केलं. सध्याचे राजकिय चित्र काही सरळ दिसत नसल्याचे सांगताना त्यांनी कोणीही सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नसल्याचं म्हटले आहे. अमित शहांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, “मला वाटतं भाजपाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाचं खातं उघडलं आहे. तुम्ही काय कामं केली ? ते लोकांना सांगा ना. रामलल्लाच्या दर्शनाचं आमिष कशाला लोकांना दाखवत आहात ? सत्तेत तुम्ही इतकी वर्षे आहात तर काय कामं केली ते सांगा.” असा टोलाही राज ठाकरे यांनी भाजपला दिला आहे.