For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबमध्ये भाजप स्वबळावर : जाखड

06:41 AM Mar 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंजाबमध्ये भाजप स्वबळावर   जाखड
Advertisement

अकाली दलासोबत झाली नाही आघाडी : सर्व 13 जागा लढविणार भाजप

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

पंजाबमध्ये भाजप स्वबळावरच लोकसभा निवडणूक लढविणार आहे. राज्यात भाजपकडून शिरोमणी अकाली दलासोबत आघाडीसंबंधी चर्चा करण्यात आली होती. परंतु दोन्ही पक्षांदरम्यान जागावाटपावरून सहमती होऊ शकली नाही. याचमुळे भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी पंजाबमधील सर्व 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार उभे केले जाणार असल्याची घोषणा मंगळवारी केली आहे.

Advertisement

लोक आणि कार्यकर्त्यांशी सल्लामसलत केल्यावर भाजपने पंजाबमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सीमावर्ती राज्य असलेल्या पंजाबमध्ये शांतता अन् समृद्धी हाच भारताच्या प्रगतीचा मार्ग आहे. राज्यातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाखड यांनी सांगितले आहे.

पंजाबमध्ये भाजपला एमएसपीच्या मागणीवरून शेतकऱ्यांच्या विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. परंतु मागील 10 वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाची सर्वाधिक प्रमाणात एमएसपीवर खरेदी करण्यात आली आहे. एमएसपीचे देयक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठवड्यात आत जमा होत आहे. कर्तारपूर साहिबच्या खुल्या दर्शनाची दशकांपासूनची मागणी पंतप्रधान मोदींकडून पूर्ण करण्यात आल्याचा दावा जाखड यांनी केला आहे.

पंजाबचे शेतकरी, व्यापारी, संगीतकार, मजूर, वंचित वर्गाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने पंजाबसाठी केलेले कार्य कुणापासूनच लपून राहिलेले नाही. आगामी 1 जून रोजी पंजाबचे लोक भाजपला आणखी मजबूत करत देशाच्या विकासात योगदान देतील असा पूर्ण विश्वास असल्याचे जाखड यांनी म्हटले आहे.

शिरोमणी अकाली दल हा भाजपच्या जुन्या सहकाऱ्यांपैकी एक होता. परंतु आता रद्द करण्यात आलेल्या तीन कृषी कायद्यांवरून अकाली दलाने सप्टेंबर 2020 मध्ये रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अकाली दल आणि भाजपने आघाडी केली होती. परंतु राज्यात या आघाडीला फारसे यश मिळाले नव्हते. पंजाबमध्ये काँग्रेसने 13 पैकी 8 जागा जिंकल्या होत्या. तर उर्वरित 5 पैकी 2 जागांवर भाजप, 2 जागांवर अकाली दल तर एका जागेवर आम आदमी पक्षाने विजय मिळविला होता.

Advertisement
Tags :

.