भाजप पदाधिकाऱ्यांची आज दिल्लीत बैठक
अध्यक्षपद उमेदवाराबाबत दिल्लीत हालचालींना वेग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार याबाबतची चर्चा सुरू असतानाच शनिवारी भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीत सदस्यत्व अभियान आणि त्यानंतरच्या संघटनात्मक निवडणुकांबाबतचा भविष्यातील कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. तसेच चार राज्यांमध्ये वर्षअखेरीस होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरही बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये सर्व राष्ट्रीय अधिकारी, प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राज्यांचे प्रभारी व सहप्रभारी सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी एकदिवसीय सभेला संबोधित करू शकतात. याशिवाय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा आणि अमित शाह हेदेखील या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. नजिकच्या काळात भाजपात संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही राज्यांमध्ये नवीन अध्यक्षांची नियुक्तीही करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश बदल संस्थेच्या निवडणुकीनंतर होणार आहेत.
जे. पी. नड्डा यांची केंद्रीय मंत्रिपदावर वर्णी लागल्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यासाठी पक्षीय पातळीवर चर्चा सुरू झाल्या आहेत. पक्षाध्यक्षपदासाठी आधी चर्चेत असलेल्या नावांचा आता केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. माजी खासदार माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव आदी नेत्यांच्या नावांची चर्चा होती. मात्र या सर्व नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मग आता कोणाची वर्णी अध्यक्षपदी लागणार याची चर्चा आता सुरू आहे.