For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

बहुमतासाठी भाजपला पक्षबदलूंची गरज नाही ! मुख्यमंत्र्यांचे ठाम प्रतिपादनः स्थिरता, विकासाच्या बळावर चौथ्यांदा स्पष्ट बहुमत मिळविणार

10:37 AM Nov 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बहुमतासाठी भाजपला पक्षबदलूंची गरज नाही   मुख्यमंत्र्यांचे ठाम प्रतिपादनः स्थिरता  विकासाच्या बळावर चौथ्यांदा स्पष्ट बहुमत मिळविणार
Advertisement

पणजी: सरकारची कार्यपद्धती, राजकीय स्थिरता आणि विकास पाहून अनेक नेते स्वेच्छेने भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आधीच स्पष्ट बहुमत असताना पक्षाला आता अन्य पक्षांतून येणाऱ्या नेत्यांची अर्थात पक्षबदलूंची गरज नाही, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. राजकीय स्थिरता आणि विकास याच मुद्यांच्या बळावर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सलग चौथ्यांदा स्पष्ट बहुमताने विजयी होईल, असे आत्मविश्वासपूर्ण निवेदन त्यांनी केले.

Advertisement

दोनापावला येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते. राज्यात भाजपचे सरकार भक्कम स्थितीत आहे. सरकारमध्ये स्थिरता आहे, सुशासन आहे आणि राज्याच्या सर्वांगिण विकासात अग्रेसर राहिले आहे. त्यामुळे बहुमत टिकवून ठेवण्यासाठी आम्हाला पक्षबदलूंवर अवलंबून राहण्याची गरज नाही, तसेच केवळ स्वार्थापोटी होणाऱ्या काही तुरळक पक्षबदलांचा भाजपच्या ताकदीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला.

त्याचबरोबर विद्यमान युतीचे घटक असलेल्या मगो पक्षाने विविध मतदारसंघांत स्वतंत्र सर्वेक्षण करण्याऐवजी युतीमधील आपल्या राजकीय मर्यादा ओळखाव्यात आणि त्याचे भान ठेवावे, असा अप्रत्यक्ष इशाराही दिला. सरकारच्या विकासकामांवर बोलताना त्यांनी, गोव्याने सुमारे १२ टक्के आर्थिक विकास दर गाठल्याचे नमूद केले. पायाभूत सुविधांचा विस्तार आणि कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी या आधारावर गोव्याने नीती आयोगाच्या शाश्वत विकास निर्देशांकात सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे, असे ते म्हणाले.

Advertisement

मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेचे केले समर्थन
दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेचे समर्थन करताना मुख्यमंत्र्यांनी, पोर्तुगीज पासपोर्ट अथवा नागरिकत्व असलेल्या व्यक्तींना भारतात मतदानाचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदार यादीतील त्रुटींवरून होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी, बूथस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) मतदारांच्या पडताळणी दरम्यान आढळलेल्या अनिवासी भारतीय व्यक्तींना विहित प्रक्रियेचे पूर्ण पालन करूनच नोटिसा बजावल्या आहेत, असे सांगितले. पडताळणीदरम्यान पोर्तुगीज नागरिकत्व असलेल्या बरोबरच अनेक व्यक्तींनी ते आखाती देशांमध्ये राहत असतानाही स्वतःच्या वास्तव्याच्या तपशीलात बदल केलेले नव्हते, असे आढळून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

खरे तर आक्षेप नोंदवण्यासाठी राजकीय पक्षांनी 'बूथ लेव्हल एजंट' नियुक्त केले होते, परंतु विहित मार्गाने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असे सांगताना डॉ. सावंत यांनी, पात्र नागरिक 'फॉर्म ६' भरून मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करू शकतात, अशी माहिती दिली.

Advertisement
Tags :

.