विरोधकांकडे नेता, नीती, नेतृत्व नाही...भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांची टीका
कोल्हापूर प्रतिनिधी
विरोधकांची अवस्था दुबळी आहे. त्यांच्याकडून देशाच्या प्रगतीचे काम होणार नाही. तसेच नेता, नीती, नेतृत्व नाही अशी टिका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी शनिवारी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत केली.
शिवराजसिंह चौहान शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. सकाळी त्यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची प्रगती होत आहे. संपूर्ण जगान भारताचे नाव होत आहे. यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपला 370 आणि एनडीएला 400 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, मुळातच विरोधक दुबळे आहेत. विरोधकांची आघाडी बनण्यापूर्वीच तुटत आहे. राहुल गांधी ज्या राज्यात यात्रा घेऊन जातात तेथील आघाडी तुटत आहे.
दिल्लीत सुरु असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणि स्वामिनाथन आयोग लागू करण्याच्या प्रश्नावर चौहान म्हणाले,स्वामिनाथन आयोगाच्या अहवालापेक्षा भाजपने शेतकऱ्यांना अधिक काही दिले आहे.भाजप कोणालाही उचलून आणत नाही तर लोक स्वत:हून भाजपमध्ये येत आहेत.येणाऱ्यांसाठी भाजप दरवाजे बंद करु शकत नाही. शरद पवार यांच्याविषयी बोलताना शिवराजसिंह चौहान यांनी त्यांचे अस्तित्व राहिले नसल्याची टीका केली.तर मणिपूरच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.
पत्रकार परिषदेला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश जाधव, राहुल चिकोडे, समरजितसिंह घाटगे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
45 वर्षांनी घेतली कोल्हापूरी चप्पल
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांनी 45 वर्षाच्या कोल्हापूरी चपलेची आठवण सांगितली.एका सहलीला मी येथे आलो होतो.त्यावेळी कोल्हापूरी चप्पल घेतली होती.त्यानंतर आता 45 वर्षांनी कोल्हापूरी चप्पल घेतली.