भाजप राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात
राष्ट्रीय महिला अधिवेशन तयारीचा घेतला आढावा : बांदोडा येथे 13 रोजी होणार अधिवेशन
पणजी : पुढील महिन्यात होणारे भाजपचे राष्ट्रीय महिला अधिवेशन, भाजपच्या संघटनात्मक कामांचा आढावा आणि राज्य मंत्रीमंडळातील संभाव्य फेरबदल आदी मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा संघटनमंत्री बी. एल. संतोष काल मंगळवारी गोव्यात दाखल झाले. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. मंत्रीमंडळ फेरबदलासंबंधी प्रश्नावर मात्र त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.
संतोष यांनी सायंकाळी 4 वाजता बांदोडा येथे श्रीमहालक्ष्मी संस्थान सभागृहात झालेल्या भाजप राष्ट्रीय महिला अधिवेशन समन्वय समिती बैठकीत भाग घेऊन अधिवेशनच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी दामू नाईक, खासदार सदानंद तानावडे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दि. 13 आणि 14 मार्च रोजी हे दोन दिवसांचे अधिवेशन बांदोडा येथे होणार आहे. त्यात भाजप परिवारातील विविध संघटनांच्या 45 महिला प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यावेळी काही पत्रकारांनी त्यांना मंत्रीमंडळ फेरबदलासंबंधी विचारले असता मात्र त्यांनी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता पूर्ण मौन बाळगले.
दामू नाईक यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यानंतर संतोष यांची ही पहिलीच गोवा भेट आहे. या भेटीत ते नव्या प्रदेश समितीला मार्गदर्शन करणार आहेत. बांदोडा येथून पणजीत दाखल झाल्यानंतर संतोष यांनी सायंकाळपर्यंत अनेक आमदार, मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. त्यात खास करून मंत्री विश्वजित राणे, आलेक्स सिक्वेरा, आमदार चंद्रकांत शेट्यो आदींचा समावेश होता. त्याशिवाय तानावडे यांनीही त्यांची भेट घेतली व विविध मुद्द्यांवर चर्चा केली.