भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आशिष सुद गोव्यात दाखल
महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
पणजी : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आशिष सुद हे गोव्यात दाखल झाले असून काल मंगळवारी त्यांनी भाजप महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी सौ. सुलक्षणा सावंत यांच्याशीही त्यांचा विचारविनिमय झाला. पणजीतील भाजपच्या मुख्यालयात हा संवाद साधण्यात आला. दक्षिण गोव्यासाठी कोणत्या महिलेला उमेदवारी द्यावी याबाबत महिला मोर्चाबरोबर चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि सौ. सावंत यांनी उमेदवारीबाबत चर्चा झाली नसल्याचा खुलासा केला. भारतीय नारीशक्ती वंदन कार्यक्रम बुधवारी भाजपतर्फे गोव्यासह देशभर होणार असून त्यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन मार्गदर्शन करणार असून गोव्यातही सर्व मतदारसंघात तो कार्यक्रम होणार असल्याचे त्या म्हणाल्या.