भाजप खासदार दगडफेकीत रक्तबंबाळ
पूरग्रस्तांना साहाय्यता देत असताना अचानक हल्ला
वृत्तसंस्था / कोलकाता
पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे खासदार खगन मुर्मू यांच्यावर जलपाईगुडी येथे हल्ला झाला आहे. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जलपाईगुडी भागाला अतिवृष्टी आणि महापुराचा फटका बसला आहे. या भागात मुर्मू हे पहाणी दौऱ्यावर असताना ही घटना घडली. त्यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ. शंकर घोष हेही होते. नाग्राकाटा भागात मुर्मू पूरग्रस्तांना साहाय्यता सामग्रीचे वितरण करीत होते. तेव्हा अचानकपणे त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. एक दगड त्यांच्या डोक्याला लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. हा हल्ला राज्यात सत्ताधारी असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसने तो नाकारला आहे. मुर्मू हे उत्तर माल्दा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.
भाजपकडून साहाय्यता कार्य
पश्चिम बंगालच्या उत्तर भागात सध्या अतिवृष्टीमुळे मोठी हानी झाली आहे. महापूर आणि भूस्खलन यांच्यामुळे लोक संत्रस्त झाले आहेत. अशावेळी लोकांना साहाय्यता करण्याचे कार्य भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते करीत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या कार्निव्हाल सणाच्या नाचगाण्यांमध्ये मग्न आहेत. पोलीस सध्या त्यांच्या दिमतीला आहेत. त्यामुळे जे लोकांमध्ये जाऊन खरे कार्य करीत आहेत, त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. राज्यातील ही स्थिती जनता बघत असून निवडणुकीत याची किंमत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसला भोगावी लागेल, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.
तृणमूल काँग्रेसकडून प्रतिवाद
ज्यांनी खासदार मुर्मू यांच्यावर हल्ला केला, त्यांनी कोणत्याही ध्वज आणलेला नव्हता. त्यामुळे ते कोणत्या गटाचे किंवा पक्षाचे आहेत, हे समजायला मार्ग नाही. राज्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने ममता बॅनर्जी यांची नालस्ती करत आहेत. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी हा हल्ला केला असणे शक्य आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी सोमवारी पत्रकारांसमोर केला आहे.