For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप खासदार मुर्मू अद्याप आयसीयूत

06:12 AM Oct 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजप खासदार मुर्मू अद्याप आयसीयूत
Advertisement

शस्त्रक्रियेची तयारी : 8 जणांच्या विरोधात एफआयआर

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

भाजपचे खासदार खगेन मुर्मू यांच्या चेहऱ्यावर झालेल्या गंभीर ईजेवरील उपचारासाठी शस्त्रक्रिया करावी लागू शकते. त्यांच्या डोळ्याखालील हाड तुटले होते, त्यावरही शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. भाजप खासदारावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली आहे. मुर्मू अद्याप आयसीयूत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

खासदार मुर्मू यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखम झाली असून त्यांच्या डोळ्याखालील हाडं तुटले आहे. वेळोवेळी त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवली जात आहे. खासदारावर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. आमचे डॉक्टर याकरता तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याच रुग्णालयात भाजप आमदार शंकर घोष यांच्यावरही उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही स्थिर आहे.

मुर्मू आणि सिलीगुडीचे आमदार शंकर घोष यांच्यावर जलपाईगुडी जिल्ह्यातील नागराकाटा भागात मदतशिबिरांचा दौरा करताना जमावाने हल्ला केला होता. या घटनेमुळे दार्जिलिंगमब्ध्ये सुरू असलेल्या शोध आणि बचावमोहिमेदरम्यान राजकीय वाद उभा ठाकला आहे. या हल्ल्याप्रकरणी लोकसभा सचिवालयाने गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. लोकसभा सचिवालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून जाब मागण्याची सूचना गृह मंत्रालयाला केली आहे.

तृणमूल काँग्रेस लक्ष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला. राज्य सरकार आणि तृणमूल काँग्रेसने  या आव्हानात्मक स्थितीत हिंसेत सामील होण्याऐवजी लोकांना मदत करण्यावर लक्ष केंद्रीत करावे अशी माझी इच्छा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर नैसर्गिक आपत्तीचे राजकीयकरण करण्याचा आरोप केला. तर खासदारावरील हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत कुणालाच अटक झालेली नाही. परंतु या घटनेत सामील 8 जणांच्या विरोधात एफआयआर नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हल्ल्याचे काही व्हिडिओ फुटेज मिळाले असून त्याच्या मदतीने आरोपींची ओळख पटविली जात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

लाथाबुक्क्यांनी मारहाण

सत्तारुढ तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी आमदार अन् खासदाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. तसेच दगडफेक केली होती. पूर आणि भूस्खलन पीडितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना तृणमूल समर्थकांनी हल्ला केला होता. पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी या हल्ल्याची छायाचित्रे जारी केली आहेत. तृणमूल काँग्रेस राज्यातील कायदा-सुव्यवस्था राखण्यास अपयशी टरले असून राजकीय हिंसेला बळ पुरवित असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.