भाजपचे आमदार भैरती बसवराज यांना अटक
कुख्यात गुंड बिक्लू शिवा खूनप्रकरणी कारवाई
बेंगळूर : कुख्यात गुंड बिक्लू शिवा यांच्या खून प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने के.आर. पुरमचे भाजप आमदार भैरती बसवराज यांना सीआयडी पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी सायंकाळी बेंगळूरच्या केंपेगौडा विमानतळावर आमदार भैरती बसवराज यांना अटक करून कार्यालयात आणत त्यांची चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वीच भैरती बसवराज यांनी आपला मोबाईल फोन बंद करून पळ काढला होता, असे सांगण्यात आले. इंडिगो- 6ई683 विमानाने अहमदाबादहून बेंगळूरला आल्याच्या माहितीवरून सीआयडी पथकाने त्यांना अटक केली आहे.
गुरुवारी सकाळी या खून प्रकरणात आरोप असणारे भाजपचे आमदार भैरती बसवराज यांना अटकपूर्व जामीन नाकारण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. शिवकुमार खून प्रकरणातील पाचवा आरोपी भैरती बसवराज यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्त्वातील खंडपीठात सुनावणी झाली. तत्पूर्वी, भैरती बसवराज यांना अटकपूर्व जामीन नाकारणाऱ्या उच्च न्यायालयाने तपास कागदपत्रे, फोटो आणि सीडीआर तपासले असता अर्जदार तपास दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे, भैरती बसराज यांना ताब्यात घेऊन तपास करण्याची अधिकाऱ्यांची विनंती फेटाळता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले होते.