हरियाणामध्ये बुधवारी भाजपची बैठक आमंत्रित
विधिमंडळ पक्षनेत्याची निवड होणार; भाजपच्या सर्व आमदारांना दोन दिवस चंदीगडमध्ये राहण्याच्या सूचना
वृत्तसंस्था/ चंदीगड
हरियाणा भाजप पक्षाची बैठक बुधवार, 16 ऑक्टोबरला होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. मुख्यमंत्री नायब सैनी यांची पुन्हा एकदा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
हरियाणातील भाजप आमदारांची बैठक भाजपच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत होणार आहे. हरियाणामधील भाजप प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी सर्व आमदारांना 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी चंदीगडमध्ये पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. नायबसिंग सैनी 17 ऑक्टोबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यापूर्वी नायब सैनी 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीमुळे शपथविधी सोहळ्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला. आता नायब सैनी 17 ऑक्टोबरला शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील बडे नेते आणि भाजपप्रणित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
दसरा मैदानावर शपथविधी
हरियाणाच्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आता परेड ग्राऊंडवर न होता दसरा मैदानावर होणार आहे. नायबसिंग सैनी आणि इतर मंत्री सेक्टर 5 मधील दसरा मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. याच मैदानावरून 2014 मध्ये मनोहरलाल यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली होती. आता नायबसिंग सैनी दुसऱ्यांदा शपथ घेणार आहेत. याआधी शपथविधी परेड ग्राऊंडवर घेण्याचे नियोजन होते. मात्र तेथे कमी आसनव्यवस्था असल्याने शपथविधीचे ठिकाण बदलण्यात आले आहे. या मैदानात सुमारे 50 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. दसरा मैदानावर सध्या भव्य व्यासपीठ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.