भाजप-मगोची युती कायम राहणार : तानावडे
मडगाव : मगो पक्ष हा सद्या भाजप सरकारचा एक घटक असून दोन्ही पक्षाचे एकमेकांकडे चांगले संबंध आहेत. हेच चांगले संबंध कायम ठेऊन आगामी जिल्हा पंचायत तसेच विधानसभा निवडणुकीत भाजप-मगो युती कायम राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दै. तरूण भारतकडे बोलताना दिली. गेल्या लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाचा भाजपच्या उमेदवारांना भक्कम असा पाठिंबा मिळाला होता. दोन्ही पक्षात यापूर्वीही युती झाली होती आणि युतीचे सरकार सत्तेवर आले होते. विद्यमान सरकारातही मगोचे नेते सुदिन ढवळीकर हे वीजमंत्री आहेत व दोन्ही पक्षाचे संबंध चांगले असल्याचे तानावडे म्हणाले. काँग्रेस व आपमध्ये काहीशी दरी निर्माण झाल्याचे चित्र सद्या दिसत आहे. यावर बोलतान तानावडे म्हणाले की, विरोधी पक्षामध्ये काय चालले आहे व काय होणार आहे, याकडे आम्ही लक्ष देत नाही. आमचे संघटन मजबूत आहे व संघटनेच्या बळावरच आम्ही दरवेळी निवडणुकीला सामोरे जात असतो.