हडफडे प्रकरणाची भाजपश्रेष्ठींकडून गंभीर दखल
पणजी : गोव्यातील हडफडे जळीत हत्याकांड प्रकरणाची गंभीर दखल भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे वृत्त रात्री हाती आले आहे. नवी दिल्लीहून मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा त्याचबरोबर पक्षाचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष या दोघांबरोबर सविस्तर चर्चा केली आहे.
भ्रष्टाचारामुळे झाले जळीतकांड
या जळीत हत्याकांडप्रकरणी बहुतांश प्रसार माध्यमांतून गोव्यातील वाढत्या भ्रष्टाचारावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे, याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागली. भाजपचे प्रचारक समजल्या जाणाऱ्या एका टीव्ही चॅनलने गोव्यावर 55 मिनिटे जे चित्रण दाखविले, त्यामध्ये गेले 25 जणांचे बळी हे गोव्याच्या भ्रष्टाचारामुळे गेले, अशा पद्धतीची उघडपणे निवेदने केली. त्यात गोव्यातील बहुतांश नेत्यांनी देखील गोव्यातील वाढत्या भ्रष्टाचाराचे हे परिणाम आहेत, असे सांगितले.
दिल्लीहून आलेल्यांनी माहिती मिळविली
या जळीत हत्याकांडानंतर पक्षश्रेष्ठींनी गोव्यात भाजपची प्रतिमा जाणून घेण्यासाठी दिल्लीतील काही मंडळींना गोव्यात पाठविले होते. त्यांनी गोव्यात फेरफटका मारला तेव्हा त्यांना अनेक नेत्यांची नावे या प्रकरणात गुंतली असल्याची माहिती मिळाली. त्यामुळेच हे प्रकरण फार गंभीर आहे आणि यामध्ये काही नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता वाढली आहे. यामुळेच पक्षश्रेष्ठींनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली आहे.
नेत्यांना बोलावून घेणार दिल्लीत
गोव्यात एकामागून एक घडत असलेल्या घटनांमुळे सरकारची, भाजपची बदनामी सर्व स्तरांवरुन होत आहे, याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. सध्या गोव्यात जिल्हा पंचायत निवडणूक चालू आहे. मात्र या दरम्यान एक-दोन नेत्यांना नवी दिल्लीमध्ये चर्चेसाठी बोलाविले जाण्याचीही शक्यता वाढली आहे.
पक्षश्रेष्ठी लवकरच घेणार ठोस निर्णय
नवी दिल्लीहून गुरुवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्ष गोव्यात काहीतरी ठोस निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत आहे, मात्र हा निर्णय नेमका कोणता असेल, याबाबत साशंकता आहे. भाजपच्याच गोव्यातील काही पदाधिक्राऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्याचे वृत्त आहे. हडफडे जळीतकांड आणि त्यात गेलेल्या 25 बळींच्या प्रकरणाची गंभीर दखल भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती हाती आली आहे.