For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्तीसगडमध्ये नक्षलींकडून भाजप नेत्याची हत्या

06:42 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
छत्तीसगडमध्ये नक्षलींकडून भाजप नेत्याची हत्या
Advertisement

मंदिरातून परतत असताना कुऱ्हाडीने चिरला गळा

Advertisement

वृत्तसंस्था/ नारायणपूर

छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी शनिवारी भाजप नेते कोमल मांझी यांची गळा चिरून हत्या केली. सकाळी मंदिरातून परतत असताना सामान्य पोशाखात आलेल्या नक्षलवाद्यांनी कोमल मांझी यांना पकडून त्यांचा गळा चिरला. आमदई खाणीचे दलाल असल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. ही घटना छोटा डोंगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Advertisement

कोमल मांझी हे नारायणपूर जिल्ह्यातील छोटा डोंगर गावातील देवी मंदिरात पूजा करून परतत असताना अज्ञात नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले आणि मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळावर एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये नक्षलवाद्यांनी मांझीवर अमदाई व्हॅली लोह खनिज खाणीसाठी एजंट म्हणून काम केल्याचा आणि प्रचंड पैसा कमावल्याचा आरोप केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आल्याचे या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नारायणपूर हे राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्र आहे. कोमल मांझी हे छोटे डोंगर येथील लोकप्रिय वैद्यांचे पुतणे असून दोघांनाही (काका-पुतण्या) यापूर्वी नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्मया आल्या होत्या. ‘गेल्या महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिल्ह्याच्या अंतर्गत भागातील काही लोकांना नारायणपूर मुख्यालयात हलवत त्यांना सुरक्षेत ठेवण्यात आले होते. मांझी आणि त्यांचे काकाही त्यात होते. मतदानाचा दुसरा टप्पा संपल्यानंतर दोघेही आपल्या गावी परतल्यानंतर त्यांनी सुरक्षा मागण्यास नकार दिला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चालू वर्षात 8 नेत्यांची हत्या

कोमल मांझी हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. याआधीही नक्षलवाद्यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. अलीकडेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष सागर साहू यांची छोटा डोंगर परिसरात हत्या झाली होती. तसेच हत्येच्या अशा अनेक घटना परिसरात घडल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत 8 नेत्यांची हत्या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Advertisement
Tags :

.