दिल्लीत भाजप नेत्याचा ‘आप’मध्ये प्रवेश
अनिल झा यांच्या पक्षत्यागाने भाजपला मोठा धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते अनिल झा यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी अनिल झा यांना पक्षात प्रवेश दिला. अरविंद केजरीवाल यांनी सामाजिक न्यायासाठी केलेल्या कामगिरीमुळे प्रभावित होऊन आपण ‘आप’मध्ये सामील झाल्याचे अनिल झा यांनी स्पष्ट केले.
अनिल झा यांच्या पक्षप्रवेशावर केजरीवाल यांनी समाधानाची भावना व्यक्त करतानाच त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. झा यांनी पूर्वांचल समाजासाठी खूप काम केले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आमच्या बांधवांना चांगले शिक्षण आणि रोजगार मिळत नाही तेव्हा ते दिल्लीत येतात. भाजप आणि काँग्रेसने त्यांच्याबाबत केवळ राजकारण केले आहे. आम आदमी पक्ष पूर्वांचलमधील समुदायासाठी न्याय देत असल्यामुळे झा यांच्यासारख्या नेत्यांचा आमच्यावर विश्वास निर्माण झाल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.