Kolhapur BJP Leader: भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा देसाई यांचे निधन
कळंबा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; सामाजिक,राजकीय, सहकार क्षेत्रातील नेत्यांची उपस्थिती
By : सागर पाटील
कोल्हापूर (कळंबा): भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते विजय ऊर्फ बाबा भाऊसाहेब देसाई (वय ७६) यांचे रविवारी (ता. 20) रोजी मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी सकाळी अकरा वाजता कळंबा स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते, नातेवाईक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबा देसाई यांनी आपल्या राजकीय वाटचालीत चार दशकांहून अधिक काळ भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मोठे योगदान दिले. दुर्गम भागात भाजपाची गमावलेली पावले रोवण्यासाठी त्यांनी सुभाष वोरा यांच्यासोबत दुचाकीवरून दौरे करत निष्ठावंत कार्यकर्त्यांची जोडणी केली. कोणत्याही पदाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता ते नेहमीच निःस्वार्थपणे पक्षासाठी झटले.
भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस, संघटनमंत्री, जिल्हाध्यक्ष आणि संयोजनमंत्री अशा विविध जबाबदाऱ्यांवर बाबा देसाई कार्यरत होते. तसेच प्रदेश कार्यकारिणीवर दीर्घकाळ निमंत्रित सदस्य होते. पक्षवाढीसाठी त्यांनी केलेल्या मेहनतीला कोल्हापुरात नेहमीच मानाचे स्थान मिळाले. गोकुळ दूध संघाचे ते स्विकृत संचालक होते. तसेच शाहू मिल्समध्ये त्यांनी अधिकारी पदावर काम केले. सहकार क्षेत्रातही त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये विश्वासार्हतेचा आदर्श ठेवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतही देसाई यांचे चांगले स्नेहसंबंध होते. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना देसाई यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी खास कोल्हापुरात आले होते. याशिवाय गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या निधनाने भाजप, सहकार व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन बहिणी, सून व नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार प्रवीण देसाई यांचे ते वडील होते.