नितीश कुमार यांनी घेतली 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ; भाजपच्या वाट्याला 2 उपमुख्यमंत्री
नितीश कुमार यांनी RJD- JD(U) सरकारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा पाठींबा घेत 9 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भारत माता की जय...जय श्रीरामच्या घोषणांच्या गजरात हा शपथविधी पार पडला. या शपथविधीला माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित होते.
इंडिया आघाडीचे समन्वय राहीलेल्या नितीश कुमार हे भाजपच्या विरोधकांची साथ सोडणार असून ते लवकरच एनडीएमध्ये परतणार असल्याच्या बातम्या माध्यमात येत होत्या. त्यानंतर बिहारच्या राजकारणात राजकिय घडामोडी वेगवान होत नितीश कुमारांनी आज सकाळी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या या राजीनाम्यामुळे राजद आणि जदयु यांचे महागठबंधनाचे सरकार कोसळले. यापुर्वीही नितीश कुमार आणि भाजपमध्ये मंत्रीपदाच्या, विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागावाटपावर अंतर्गत चर्चा सुरु होत्या.
दरम्यान आज दुपारी 4 वाजता नितीश कुमार यांनी आपल्या आमदारांसह भाजपच्या मदतीने राज्यात सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला. त्यानंतर नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 9 व्यांदा शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यासह भाजपचे सम्राट चौधरी, विजय सिन्हा यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) देखील नवीन सरकारचा एक भाग असेल. मोर्चाचे अध्यक्ष डॉ. संतोष कुमार सुमन यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारमधील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे नितीशकुमार यांचे आता नवे मंत्रिमंडळ येणार असून रातोरात आरजेडीचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत.