‘विधानपरिषद’ संदर्भात भाजप-निजदची बैठक
जागावाटप, उमेदवार निवडीबाबत झाली चर्चा : जूनमध्ये होणार विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक
बेंगळूर : आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात भाजप आणि निजद या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दरम्यान, जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत चर्चा करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सकाळी त्यांच्या डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानी भाजप आणि निजदच्या नेत्यांची बैठक झाली. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या बेंगळूर शिक्षक मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि मे-जूनमध्ये होणाऱ्या विधानपरिषदेच्या 6 मतदारसंघांच्या निवडणुकीबाबत चर्चा केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत युतीचे पक्ष भाजप-निजद यांच्यातील जागावाटप, कोणत्या मतदारसंघातून कोणाला रिंगणात उतरवायचे आणि कोणाला उमेदवारी द्यायची. या सर्व बाबींवर चर्चा झाली आहे.
बैठकीत भाजप ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा, माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, खासदार डी. व्ही. सदानंदगौडा, विरोधी पक्षनेते आर. अशोक, माजी मंत्री गोविंद कारजोळ, माजी मंत्री डॉ. सी. एन. अश्वथनारायण, जी. टी. देवेगौडा, बंडेप्पा काशमपूर, निखिल कुमारस्वामी, आदींचा सहभाग होता. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. केवळ विधानपरिषद निवडणुकीसाठी जागावाटप आणि उमेदवारांची निवड यावर चर्चा करण्यात आली आहे. बैठकीत भाजपने कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवावी, निजदला किती जागा द्याव्यात, यावर चर्चा झाली आहे. भाजप वरिष्ठ नेत्यांना याबाबतची माहिती देऊन जागावाटपाबाबत त्यांनाच निर्णय घेण्यावर सहमती दर्शविण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. फेब्रुवारीत होणाऱ्या बेंगळूर शिक्षक मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची जागा निजदला द्यावी, अशी मागणी निजद नेत्यांनी केली असून हा निर्णय घेण्याचाही निर्णय भाजप वरिष्ठ नेत्यांकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय, आगामी पदवीधर आणि शिक्षकांच्या 6 मतदारसंघाच्या निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी एकमत करून उमेदवार निवडीबाबत चर्चा केली आहे. बैठकीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अतिशय सौहार्दपूर्ण चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
लवकर उमेदवार जाहीर करण्याची विनंती करण्याचा निर्णय
भाजप आणि निजदच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये आगामी विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा झाली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना लवकरात लवकर उमेदवार जाहीर करण्याची विनंती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
-बी. वाय. विजयेंद्र, भाजप प्रदेशाध्यक्ष
निवडणुकीत एकत्र जाण्याचा संदेश
भाजप आणि निजद पक्षातील प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली असून दोन्ही पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र जाण्याचा संदेश दिला आहे. आजच्या बैठकीत बेंगळूर शिक्षक मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि विधानपरिषदेच्या 6 मतदारसंघांच्या निवडणुकीबाबत चर्चा केली आहे.
-एच. डी. कुमारस्वामी, निजद प्रदेशाध्यक्ष