चन्नपट्टणमध्ये भाजप-निजद युतीला धक्का
प्रतिनिधी/ बेंगळूर
चन्नपट्टण विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असलेले माजी मंत्री सी. पी. योगेश्वर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे. त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून तिकीट देण्यास टाळाटाळ करीत असलेल्या भाजप-निजद युतीला योगेश्वर यांनी धक्का दिला आहे. ते गुरुवारी काँग्रेसतर्फे चन्नपट्टणमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यामुळे भाजप-निजद युतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाते, याविषयी कुतूहल निर्माण झाले आहे. चन्नपट्टण विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविण्याचा ठाम निर्धार केलेल्या काँग्रेस नेत्यांना अखेर सी. पी. योगेश्वर यांना आपल्या पक्षात आणण्यात यश मिळाले आहे.
चन्नपट्टण मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजप-निजद नेत्यांमध्ये अनेक वेळा चर्चा झाल्यानंतर भाजपश्रेष्ठींनी निजदला मतदारसंघ सोडून देण्याची तयारी दर्शविली. दुसरीकडे निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम राहिलेल्या योगेश्वर यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे ते घोषणा केल्यानुसार अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील की काँग्रेसच्या तिकिटावर? याविषयी तर्कवितर्क व्यक्त झाले. अखेर काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न फळले असून योगेश्वर यांनी बुधवारी बेंगळूरमधील काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत काँग्रेसप्रवेश केला. त्यानंतर लागलीच काँग्रेस नेत्यांनी योगेश्वर यांनी चन्नपट्टणचे तिकीट जाहीर केले. यामुळे भाजप-निजद युतीला धक्का बसला आहे.
निजदचा नकार, पक्षांतराचा निर्णय
माजी मंत्री सी. पी. योगेश्वर यांनी सोमवारी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी हालचाली गतिमान केल्या. स्वत: मुख्यमंत्र्यांनी योगेश्वरना काँग्रेसमध्ये आणण्यात रस दाखविला. शिवाय उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि माजी खासदार डी. के. सुरेश यांनी देखील वैरभावना विसरून सी. सी. योगेश्वरना पक्षात आणण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. याच दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सायंकाळी योगेश्वरना फोन करून तडकाफडकी निर्णय घेऊ नका. प्रतीक्षा करा, असा सल्ला देत भाजपचे तिकीट देण्यासंबंधी निजद नेत्यांशी चर्चा केली. परंतु, निजदने नकार दर्शविला. त्यामुळे आपल्याला भाजपचे तिकीट मिळणार नसल्याची खात्री होताच त्यांनी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेतला.
रात्रभर चर्चा अन् मनपरिवर्तन
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत एका हॉटेलमध्ये योगेश्वर यांच्याशी पोटनिवडणुकीवर चर्चा केली. तसेच काँग्रेसप्रवेशाचा पर्याय ठेवला. त्यात ते यशस्वीही झाले. योगेश्वर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास तयारी दर्शविली. बुधवारी सकाळीच योगेश्वर यांनी सदाशिवनगर येथील शिवकुमार यांच्या निवासस्थानाला भेट देऊन तेथे देखील काही वेळ चर्चा केली. तेथून थेट योगेश्वर यांच्यासमवेत शिवकुमार, डी. के. सुरेश यांनी सिद्धरामय्यांची त्यांच्या कावेरी या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी योगेश्वर यांनी मुख्यमंत्र्यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. तत्पूर्वी योगेश्वर यांनी व्हॉट्सअॅपवरून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना पाठवून दिला.
अपक्ष, काँग्रेस, भाजपमधून आमदार, आता पुन्हा काँग्रेसकडून संधी
सी. पी. योगेश्वर अपक्ष उमेदवार म्हणून चन्नपट्टणमधून सर्वप्रथम निवडून आले होते. नंतर त्यांनी काँग्रेस प्रवेश करत येथूनही आमदान बनले. नंतर भाजपप्रवेश करून या पक्षाच्या तिकिटावरही निवडणूक जिंकली. आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले असून पोटनिवडणूक लढवत आहेत. निजद वरिष्ठ नेते एच. डी. कुमारस्वामी यांची लोकसभेवर निवडून आल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता किंवा पुत्र निखिल यांना निजदची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
बिनशर्त प्रवेश
माजी मंत्री सी. पी. योगेश्वर यांनी काँग्रेसमध्ये बिनशर्त प्रवेश केला आहे. राजकारणात काहीही अशक्य नाही. काहीही होऊ शकते. योगेश्वर यांनी पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केल्यानंतर मी त्वरित हायकमांडशी संपर्क साधून चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची भेट घेऊन योगेश्वर यांच्या पक्षप्रवेशाला वरिष्ठांची संमती मिळविली.
- डी. के. शिवकुमार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री
पुन्हा मूळ घरात परतलो!
मी पुन्हा मूळ घरात परतलो आहे. डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली राजकीय जीवनाला प्रारंभ केला होता. काही प्रसंगी आम्ही बांधलेल्या घरात स्वत:च राहणे शक्य होत नाही. काही दिवसांपासून चाललेल्या राजकीय घडामोडींमुळे भाजपात राहणे शक्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे.
- सी. पी. योगेश्वर, माजी मंत्री