For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेघालयात भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष

06:44 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
मेघालयात भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष
Advertisement

यूडीपीच्या 8 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश : ईशान्येच्या राज्यातील समीकरणे बदलणार

Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

मेघालयाच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे. यूनायटेड डेमोक्रेटिक पार्टीच्या (यूडीपी)8 आमदारांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात या आमदारांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. यावेळी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारी अनिल एंटनी उपस्थित होते.

Advertisement

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये लहकमेन रिंबुई, पियुस मारवीन, किर्मेन शायला, मेयरलबोर्न सिएम, मॅथ्यू कुरबाह, ओलान सिंह सुइन, बालाजिएड कुपार सिनरेम आणि सिनशार लिंगडोह थाबाह सामील आहेत. या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मेघालय विधानसभेतील गणित बदलले आहे. 60 सदस्यीय विधानसभेत यूडीपीचे एकूण 12 आमदार होते, आता यातील 8 आमदार भाजपमध्ये गेले आहेत, तर भाजपकडे पूर्वी दोन आमदार होते. पक्षाचे एकूण संख्याबळ आता वाढून 10 झाले आहे. तर याचबरोबर भाजप विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर विधानसभेत नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) सर्वाधिक 33 आमदार असणारा पक्ष आहे.विधानसभेत सत्तारुढ मेघालय डेमोक्रेटिक अलायन्सच्या आमदारांची एकूण संख्या 51 आहे. तर विरोधकंच्या वतीने तृणमूल काँग्रेसचे 5 आमदार आहेत. तर वॉइस ऑफ द पीपल पार्टीचे चार आमदार आहेत.

यूडीपीचे दोन आमदार यापूर्वीच मुख्यमंत्री  कॉनराड के. संगमा यांच्या नेतृत्वाखालील मेघालय डेमोक्रेटिक अलायन्स सरकारमध्ये मंत्री देखील आहेत. अशास्थितीत 8 आमदारांनी पक्षांतर करणे यूडीपीसाठी मोठा धक्का आहे. या 8 आमदारांच्या भाजपप्रवेशाची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होती. 16 सप्टेंबर रोजी यूडीपी आमदार किर्मेन शायला यांनी पक्षाच्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. शायला यांच्यानुसार आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता विश्व शर्मा यांची भेट घेतली होती. त्यानंतरच भाजपप्रवेशाचा निर्णय झाला होता. आमदारांनी पक्षांतर करण्यापूर्वी स्वत:च्या काही मागण्यांवर ठोस आश्वासनाची मागणी केली होती.

 कोळसा खाण, खासी भाषेचा मुद्दा

कोळसा खाणीशी निगडित नियमांमध्ये बदल करण्याची या आमदारांची प्रमुख मागणी आहे. याचबरोबर खासी भाषेला राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीत सामील करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांना 2028 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, याचमुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा या आमदारांनी केला आहे. तर या आमदारांनी मेघालय रेजिडेंट्स सेफ्टी अँड सिक्युरिटी अॅक्ट लागू करण्याची मागणी देखील केली होती. या मागण्यांवर राष्ट्रीय नेतृत्वासोबत चर्चेनंतर या आमदारांच्या भाजपप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.

भाजपसाठी महत्त्वपूर्ण

8 आमदारांच्या प्रवेशामुळे भाजप आता मेघालय विधानसभेत 10 आमदारांसोबत दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे राज्यात पक्षाची उपस्थिती वाढली आहे. भाजप यापूर्वीच मेघालय सरकारमध्ये सामील आहे. आता यूडीपीच्या 8 आमदारांच्या प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात भाजपचे बळ वाढले आहे. आगामी काळात याचा प्रभाव सरकार आणि विरोधकांदरम्यान राजकीय समीकरणांवरही दिसून येऊ शकतो.

Advertisement
Tags :

.