For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशहीत जपणारा भाजप एकमेव पक्ष

01:19 PM Apr 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
देशहीत जपणारा भाजप एकमेव पक्ष
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : पणजीत भाजपचा स्थापना दिन उत्साहात

Advertisement

पणजी : भाजपची जडण-घडण ही सहजासहजी आणि सोप्या पद्धतीने झालेली नाही. यामागे अनेक कार्यकर्त्यांचे बलिदान आणि योगदान आहे. देशाला 60 वर्षे झाल्यानंतरही पक्षाला कुणीच जवळ करण्यासाठी पाहत नव्हते. अशा काळात अनेक कठीण परिस्थितीत स्वत:ला सावरण्याबरोबरच पक्षाला उभारी देण्यात अनेकांनी आपल्या सांसारिक बलिदानाचीही आहुती दिली. त्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष हा मोठ्या ताकदीने उभा आहे. देशहित हीच विचारधारा जपणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. या पक्षाने केवळ देशहित पाहिले असे नाही, तर देश स्वातंत्र्यानंतर गोव्याला 14 वर्षानंतर मुक्त करण्यातही डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यासमवेत जनसंघाचे म्हणजे भाजपचे नेते पुढे आले, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पणजी भाजप मुख्यालयात भाजपच्या 46 व्या स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी पक्षाची दिशा आणि धुरा याविषयी भाष्य केले. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, गोविंद पर्वतकर, तर उपस्थितांमध्ये ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, सांताक्रुझचे आमदार ऊदाल्फ फर्नांडिस उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, गेल्या 50 वर्षांत काँग्रेसने देशाचा विकास करण्यापेक्षा राजकीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. गेल्या अकरा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने प्रत्येक क्षेत्रात विकास केला. मुस्लिम महिलांसाठी जाचक असलेला ट्रीपल तलाक रद्दचा निर्णय हा ऐतिहासिक ठरला. काश्मिरमध्ये एक देश एक ध्वज व्हावा, यासाठी भाजपनेच पुढाकार घेऊन त्या ठिकाणची मक्तेदारी दूर केली. वक्फ बोर्ड हा सर्वसामान्यांसाठी पूरक ठरावा यासाठीही भाजपनेच पाऊल उचलून याविषयी कायदा आणला.

Advertisement

माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद पर्वतकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भाजपच्या स्थापनादिनानिमित्त पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. राज्यात भाजप वाढवण्यात जुने नेते आणि कार्यकर्त्यांचे योगदान आहे. जनसंघाच्या अनेक नेत्यांनी गोवा मुक्तीच्या लढ्यात सहभाग घेतला. त्यामुळे त्यांचे विस्मरण होता कामा नये. भाजप हा देशहित प्रथम, पक्ष दुय्यम आणि आम्ही कार्यकर्ते आणि नेते तृतीय असे मानणारा पक्ष आहे. त्यामुळे विकसित भारतासाठी यापुढील 100 वर्षे भाजप कार्यकर्ते न थकता कार्यरत राहतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी व्यक्त केला.

संविधाननिर्मात्याचा अपमान काँग्रेसकडूनच

काँग्रेसने 50 वर्षांची सत्ता उपभोगताना केवळ आपल्या फायद्यासाठी राजकारण केले. देशात आणीबाणी लागू करताना काँग्रेसने संविधानाचीही पर्वा केली नाही. त्यांनीच घटनेत आणीबाणीसाठी बदल करून देशातील करोडो लोकांना वेठीस धरले. हा काळ लोकांच्या अस्मितेचा प्रश्न होता. म्हणून लोकांनी पुढील निवडणुकीत काँग्रेसला धूळ चारली. संविधाननिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि संविधानाचा अपमान काँग्रेसने केलेला आहे, असा घणाघात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी विरोधकांवर केला. समाजसेवा आणि देशहित यासाठी भाजपने आपली विचारधारा सोडली नाही, त्यामुळे तीन वेळा भाजप केंद्रात सत्तेवर आला, असेही श्रीपाद नाईक म्हणाले.

Advertisement
Tags :

.