लोकप्रियता सहन होत नसल्याने भाजपकडून अपप्रचार!
बेंगळूर : राज्य सरकारची लोकप्रियता सहन होत नसल्याने भाजप नेते अपप्रचार करत आहेत. समाजातील जातीय सलोखा बिघडवण्याचे काम विरोधी पक्ष करत आहे, अशी टीका महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. शुक्रवारी उडुपी जिल्ह्यातील नीरे ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांशी त्या बोलत होत्या. राज्य सरकार हिंदूविरोधी असल्याचा भासविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. विरोधी पक्षांना राज्य सरकारवर आरोप करण्याशिवाय दुसरा विषय नाही. गॅरंटी योजना जारी होणार नाहीत, जारी झाल्या तरी 4 महिन्यात बंद पडतील, असा खोटा प्रचार भाजपकडून झाला होता. मात्र, आमच्या सरकारने या योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. जनतेला अनेक सुविधा दिल्या आहेत, असे त्या म्हणाल्या.
कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही!
भाजप नेते सी. टी. रवी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्याने विरोधी पक्षांनी सरकारचा निषेध नोंदविला आहे. याबद्दल प्रतिक्रिया देतान मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या, आक्षेपार्ह भाषण करणारे कोणत्याही पक्षाचे असले तरी कारवाई केली जाईल. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे त्या म्हणाल्या.