For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप प्रत्येक आव्हानासाठी सज्ज!

06:57 AM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजप प्रत्येक आव्हानासाठी सज्ज
Advertisement

भाजपच्या स्थापना दिनी पंतप्रधानांचा व्हिडीओ संदेश : देशभर विविध कार्यक्रम

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचा 47 वा स्थापना दिवस सोमवारी साजरा करण्यात आला. स्थापना दिवस साजरा करण्यासाठी देशभरातील भाजप कार्यालयांमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान मोदी यांनी यानिमित्ताने एक व्हिडीओ संदेश जारी करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. तसेच त्यांनी पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेतला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

Advertisement

देशातील लोकांचा भाजपवर सातत्याने विश्वास वाढत असल्याचा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशात अनेक विषयांवर प्रकाशझोत टाकला. ‘भाजप प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करत राहील. आम्ही भूतकाळात सकारात्मक परिणाम पाहिले आहेत आणि भविष्यातही ते पाहत राहू,’ असे आवाहन त्यांनी केले आहे. ब्रिटिश काळातील शेकडो जाचक कायदे रद्द करणे, लोकशाहीसाठी नवीन संसद भवनाची उभारणी, सर्वसामान्य जनतेतील गरिबांसाठी 10 टक्के आरक्षण, सीएए कायदा करून तिहेरी तलाकवर बंदी आणि अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अशा असंख्य उपलब्धी भाजपच्या  कारकिर्दीत पूर्ण झाल्याचे मोदी म्हणाले.

आम्ही पक्षाला आई मानतो : पंतप्रधान

पंतप्रधान मोदी म्हणाले, भाजप हा एकमेव राजकीय पक्ष आहे, ज्याला आम्ही आमची आई मानतो. त्यामुळे, पक्षाचा स्थापना दिवस हा केवळ एक राजकीय कार्यक्रम नाही; तर आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी हा एक भावनिक प्रसंग आहे. हा दिवस आम्हाला राष्ट्रसेवेची संधी दिल्याबद्दल पक्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. भाजप स्थापना दिनानिमित्त देशभरातील लाखो भाजप कार्यकर्त्यांना आणि भाजपला पाठिंबा देणाऱ्या माझ्या देशातील सर्व नागरिकांना मी मन:पूर्वक शुभेच्छा देतो, असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

नितीन नबीन यांची प्रशंसा

पंतप्रधानांनी पक्षाचे नवीन अध्यक्ष नितीन नबीन यांच्या कार्याची प्रशंसाही केली. सध्याच्या निवडणुकांचा संदर्भ देत ज्या राज्यांमध्ये सध्या निवडणुका सुरू आहेत, तिथेही त्यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा दिसत असल्याचे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांमधील ही ऊर्जा पाहून नबीनजींनी (भाजप अध्यक्ष नितीन नबीन) पक्षात नवचैतन्य निर्माण केल्याचे स्पष्टपणे दिसून येते असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘आरएसएस’कडून प्रेरणा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आरएसएसच्या विशाल आणि पवित्र वटवृक्षाच्या छायेतून आम्हाला स्पष्ट हेतू आणि सचोटीने राजकारणात प्रवेश करण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर, पहिल्या काही दशकांमध्ये आम्ही संघटनेसाठी धोरणे तयार करण्यावर आमची ऊर्जा केंद्रित केली. त्यानंतर अशी वेळ आली, जेव्हा भाजपने पूर्ण समर्पणाने एक मजबूत कार्यकर्ता-आधारित पक्ष उभारण्यास स्वत:ला वाहून घेतले. आतापर्यंत आम्ही  कार्यकर्त्यांचा एक मोठा कार्यकर्ता-वर्ग तयार केला आहे. सदर कार्यकर्त्यांनी पक्षाच्या तत्त्वांना आपल्या जीवनाचे ध्येय बनवले असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.