भाजपची शतप्रतिशतकडे वाटचाल
नगरपालिका, नगरपंचायत आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालातही भाजपने वर्चस्व मिळवले आहे. ग्रामीण जनतेशी संबंधीत असलेल्या मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणूक निकालात भाजपने घेतलेली आघाडी बघता, भाजपची आता शतप्रतिशतकडे वाटचाल सुरू झाली आहे. कोणाच्याही पाठिंब्याशिवाय भाजप आता राज्यात सगळ्या निवडणुका लढू शकतो हे कालच्या जि. प. आणि पंचायत समिती निकालातून सिध्द झाले. भाजपसोबत असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील काही प्रमाणात यश मिळालेले असले तरी, महाविकास आघाडीतील काँग्रेसने लातुरमध्ये, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने सांगलीत आपले वर्चस्व सिध्द केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणावर वर्चस्व ठेवण्यासाठी तसेच ग्रामीण विकासाचा पाया असणाऱ्या गावातील सहकारी संस्थांवर पकड ठेवण्यासाठी पंचायत समिती आणि जि.प. निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात. भाजपसह महायुतीला मिळालेले यश बघता, ग्रामीण राजकारणाच्या नव्या अध्यायाला आता सुरूवात झाली आहे.
महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या शहरी भागातील निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकांचा निकाल सोमवारी लागला. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपने 12 पैकी 8 जिल्हा परिषद तर 125 पैकी 48 पंचायत समीतीवर दुपारपर्यंत आपले वर्चस्व सिध्द केले. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गटाने 12 पैकी 3 जिल्हा परिषद तर 26 पंचायत समिती निकालात आघाडी घेतली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एका जिल्हा परिषदेसह 23 पंचायत समितीत यश मिळवल्याचे चित्र होते. महाविकास आघाडीतील काँग्रेसला लातूर जिह्यात तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सांगलीत मोठा पक्ष होण्याचा मान मिळाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीच्या वेळी लातूरमधील विलासरावांची ओळख पुसवुन काढण्याची भाषा केली, मात्र झाले उलटेच काँग्रेसकडे एकमेव लातूरची महापालिका आली. आता जिल्हा परिषदेत देखील सत्ता येण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिका निवडणुकीचे निकाल लागून आता महिना होईल, जवळपास सर्व महापालिकांच्या सत्तेची गणिते बसली, महापौरांची घोषणा झाली, महापौर खुर्चीत पण बसले. मात्र काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या दोन नेत्यातील वादामुळे चंद्रपूरचा काही महापौर होत नाही, एक तर काँग्रेसला यश मिळत नाही आणि जिथे मिळाले तिथे सत्ता गेली तरी चालेल मात्र कुरघोडी सुरूच राहणार असल्याचे दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना मुंबई, ठाणे आणि एमएमआर विभाग यातून वेळच मिळत नाही. त्यामुळे त्यांना सत्ता आली काय, नाही आली काय सोयर सुतक नाही. भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मात्र या निवडणुकीत अनेक ठिकाणी चुरस पहायला मिळाली. ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार पराभूत झाले, त्या ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारांनीच बाजी मारल्याचे दिसत आहे. म्हणजेच भाजपसमोर अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेच आव्हान निर्माण केल्याचे दिसत आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या प. महाराष्ट्रात दादांच्या निधनानंतर सहानुभुती मिळताना दिसत आहे. पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार गटाचे वर्चस्व तर, कोल्हापुरात महायुती सत्तेच्या जवळ जात असली तरी अजित पवारांच्या पक्षाला येथे सगळ्यात जास्त जागा मिळताना दिसत आहे. सोलापूर, सातारा येथे भाजपची सत्ता येताना दिसत आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा निकाल पाहता शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातच खरी लढत झाली आहे. सिंधुदुर्गात भाजपची एक हाती सत्ता आली आहे तर रत्नागिरीत शिवसेना शिंदे गटाचा दबदबा कायम राहिल्याचे दिसत आहे. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्यात चुरस बघायला मिळत आहे. रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गट मोठा पक्ष ठरल्यास, पुन्हा एकदा शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी या वादाला येथे सुरूवात होताना दिसणार आहे.
जिल्हा परिषद निकालाचा विचार करता लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून सुरू झालेली घराणेशाही जिल्हा परिषद निवडणुकीतही कायम दिसली. पंचायत समितीच्या निवडणुकीत मात्र कार्यकर्त्यांना संधी मिळाली. धाराशीव लोकसभा मतदार संघातून पराभव झालेल्या भाजपच्या अर्चना पाटील या जि.प. निवडणूकीत विजयी झाल्या,तर लोकसभा आणि विधानसभेला पराभव झालेल्या राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते या विजयी झाल्या. पक्षाला शेवटी काळजी आहे, दोन पराभव पदरी पडल्यानंतर सातपुतेंसाठी पक्षाने भाकरी फिरवत त्यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आणि सातपुतेंचा विजय झाला. माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या घरातील पाच पैकी तब्बल चौघांचा पराभव झाला तर विद्यमान मंत्री जयकुमार गोरे यांचे भाऊ अरूण गोरे आणि वहिनी भारती गोरे यांचा पराभव झाला आहे. गोरे यांना त्यांच्याच मतदार संघात धक्का देत राष्ट्रवादीने आव्हान निर्माण केले आहे. जि.प निवडणुकीत जे निवडून आले त्यामध्ये देखील नेत्यांच्या नातेवाईकांचाच अधिक भरणा आहे. तानाजी सावंत यांचे दोन पुतणे, भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांचा समावेश आहे. भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाने आपले ग्रामीण राजकारणावर वर्चस्व सिध्द केले आहे. आगामी काळात जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीत मोठी राजकीय समीकरणे तयार होताना दिसतील. काल निकाल लागल्यानंतर सगळ्याच विजयी उमेदवारांनी आपला विजय कार्यकर्त्यांना आणि मतदारांना समर्पित असल्याचे सांगितले, ज्या उमेदवाराला मतदारांनी ज्या विरोधी उमेदवारा विरोधात निवडून दिले, त्या विरोधी उमेदवाराच्या पक्षालाच आता सत्तेसाठी पाठिंबा द्यावा लागत आहे. ज्या जनतेला आणि कार्यकर्त्याला विजय समर्पित केला, त्याच्या भावना हा पाठिंबा देताना विश्वासात घेणार का? हा मुद्दा महत्त्वाचा आहेच, पण बिनविरोधच्या टेंडमध्ये किमान निवडणूका होतात हे देखील कमी नाही.
प्रवीण काळे