भाजपच धुरंधर!
दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची सत्ता : एकूण 29 जागांसह भाजप ठरला नंबर वन पक्ष

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये अखेर भाजपनेच बाजी मारली. एकूण लढवलेल्या चाळीसपैकी 29 जागांवर विजय प्राप्त केला, तर युतीमध्ये असलेल्या मगो पक्षाने तीनपैकी तीनही जागांवर विजय प्राप्त केला. दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपचा झेंडा फडकला आहे. काँग्रेसला 10 जागांवर यश प्राप्त झाले. गोवा फॉरवर्डला एक, आरजीपीला दोन, आपला एक, तर अपक्ष चार जागांवर विजयी झाले आहेत. भाजप अध्यक्ष दामू नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तमाम गोमंतकीय जनतेचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोमंतकीय जनतेचे अभिनंदन करून आभार मानले आहेत. आगामी विधानसभेसाठीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करताना आपणच ‘धुरंधर’ आहोत, हे सिद्ध केले आहे. आचारसंहिता संपुष्टात जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी गोवा राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 पासून लागू केलेल्या आचारसंहितेचा काळ संपला आहे.
रात्री नऊ वाजेर्पंत सुरु होती मतमोजणी...
जिल्हा पंचायत निवडणूक निकालातून मतदारांचा एकंदरीत कल सत्ताधारी भाजपच्या बाजूने असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सकाळी 8 वाजता राज्यातील 12 तालुक्याच्या ठिकाणी निश्चित झालेल्या केंद्रात मतमोजणीचे काम सुरु झाले. निवडणूक आणि मतदान हे मतपत्रिकेच्या स्वरुपात असल्यामुळे मतमोजणी होण्यास वेळ लागत होती. तसेच काही मतदारसंघातील काही उमेदवार कमी मताधिक्याने विजयी झाल्यामुळे तेथे फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. त्यामुळे काही केंद्रात मतमोजणीस उशीर होत असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून नंतरच्या मतदारसंघातील मतमोजणीस उशीर झाला. पेडणेतील तोरसे, तिसवाडीतील सेंट लॉरेन्स व बार्देश तालुक्यातील मतमोजणी उशिरापर्यंत सुरु होती.
दुपारपर्यंत भाजपची सरशी स्पष्ट
दुपारी 3 वाजता उत्तर गोवा जिल्ह्यात भाजपला दहा जागा मिळाल्या होत्या तर त्यावेळी कॉंग्रेस पक्षाने खातेही उघडले नव्हते. आरजीला तेव्हा 1 जागा तसेच मगोपला 1 जागा तर दोन जागा अपक्षांना लाभल्या होत्या. दक्षिण गोवा जिल्ह्यात त्या वेळेला भाजपच्या नावावर 9 जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसने सहा जागा पटकावल्या होत्या. अपक्ष दोन, मगो, आप, गोवा फॉरवर्ड यांना प्रत्येकी 1 जागा असे चित्र त्यावेळी होते. बहुमताकडे होत असल्याचे चित्र दुपारच्या वेळी दिसून येत होते.
दोन्ही जिल्ह्यात भाजपला बहुमत
जिल्हा पंचायतींच्या 50 जागांकरीता 226 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मतदान सुमारे 70 टक्के झाल्यामुळे नवीन सदस्य कोण होणार ? तसेच राजकीय पक्षांचे भवितव्य याबाबत जनतेमध्ये मतदारांत आणि उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता होती. मतमोजणी केंद्रावर सकाळपासूनच उमेदवारांचे कार्यकर्ते, समर्थक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. दुपारनंतर हळूहळू निकाल यायला सुरुवात झाली.
भाजपने जि. पं. निवडणुकीत मिळवलेला विजय हा पक्षाचा नसून, जनतेचा आहे. भाजप हा जनतेच्या विकासासाठी झटणारा पक्ष आहे. विरोधकांसारखे खोटे आरोप करणारा भाजप पक्ष नाही. संस्कृती, भाजप प्रत्येकाच्या मनात, हृदयात आहे. विरोधकांना आता ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरच्या मुद्यावर बोलण्याचा कोणताच अधिकार नाही. त्यांनी जनतेला आतातरी प्रमाण मानावे. देशातील विविध राज्यांतही भाजपला मतदार जवळ करीत आहेत.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
भाजप हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. देशात काँग्रेसला सर्वच ठिकाणी धोबीपछाड मतदारांनी दिलेली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आणि यातही मतदारांनी भाजपलाच मोठ्या फरकाने जिंकून दिले. ही विरोधकांना मतदारांनी दिलेली सणसणीत चपराक आहे. यापुढीलही सर्व निवडणुकीत भाजपवरच जनता विश्वास दाखवेल. कारण भाजप हा विकास करणारा पक्ष आहे.
- दामोदर नाईक, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष
या निवडणुका आगामी 2027 विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर झाल्या म्हणायला हरकत नाही. मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत भाजपक्ष आणि मगो या युतीला भरभरून मतदान केले. भाजप आणि मगो ही युती अभेद्य आहे. अनेक निवडणुकीत या युतीला जनतेने जवळ केलेले आहे. मगोच्या उमेदवारांनाही जनतेने निवडून आणल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.
- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री तथा मगोचे ज्येष्ठ नेते
जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाचे मिळालेले यश ही फक्त सुरवात आहे. गोव्यातील मतदार भाजपच्या पोकळ आश्वासनांना आणि फुटीर राजकारणाला कंटाळले आहेत. आम्हाला विश्वास आहे की ही गती आम्हाला 2027 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत निर्णायक विजयाकडे नेईल. लोक बदलासाठी तयार आहेत आणि काँग्रेस खरोखरच सर्वांसाठी काम करणारे सरकार देण्यासाठी सज्ज आहे. काँग्रेस प्रगतीचा दिवा म्हणून गोव्याचे वैभव पुनर्संचयित करेल. आम्ही मतदारांचे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, प्रदेशाध्यक्ष, खासदार, आमदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो.
- माणिकराव ठाकरे, गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी
गोवा फॉरवर्डला नऊ जिल्हा परिषदेच्या जागांवर 26,850 मते (22.80 टक्के) मिळाली. एकूण दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते. परंतु फक्त 1 जागा (राय) जिंकली. रिवणमध्ये 19 मतांनी झालेला हृदयद्रावक पराभव आणि इतरत्र मिळालेल्या चांगल्या कामगिरीवरून हे दिसून येते की गोवा फॉरवर्डवर लोकांचा विश्वास आहे. आमच्या पहिल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आमच्यासोबत उभ्या राहिलेल्या प्रत्येक मतदाराचे आम्ही नम्रपणे आभार मानतो.
- विजय सरदेसाई, गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख