For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप विकास साधणारा पक्ष : नितीन नबीन

07:30 AM Feb 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजप विकास साधणारा पक्ष   नितीन नबीन
Advertisement

प्रत्येक बुथवर 50 टक्के मते मिळविण्याचे  :  ध्येय गाठा- - बहुमताने जिंकण्यासाठी आराखडा तयार 

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

भारतीय जनता पक्ष हा शेतकरी, महिला, युवा व गरीब जनतेचा विकास साधणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे घोटाळा अन् भाजप पक्ष म्हणजे केवळ विकास होय. काँग्रेसचे नेते पार्टटाईम  याची जाणीव जनतेला करून द्या. भाजपची खरी ताकद हे गटाध्यक्ष आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बुथवर 50 टक्के मते मिळावीत, यासाठी स्वत:ला झोकून द्या. बहुमताने जिंकण्यासाठी आराखडा तयार आहे, त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी केले.

Advertisement

ताळगाव येथील कम्युनिटी सभागृहात काल, शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता संमेलनात ते मार्गदर्शन करीत होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, मंत्री रमेश तवडकर, मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री दिगंबर कामत, मंत्री सुभाष शिरोडकर, मंत्री सुभाष फळदेसाई, मंत्री नीळकंठ हळर्णकर, सरचिटणीस अरूण चुग, तर आमदारांपैकी गोविंद गावडे, मायकल लोबो, संकल्प आमोणकर, दाजी साळकर, प्रवीण आर्लेकर, डॉ. देविया राणे, डिलायला लोबो, माजी खासदार विनय तेंडुलकर, अॅड. नरेंद्र सावईकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष नबीन म्हणाले की, भाजप नेत्यांनी येणारी गोवा विधानसभा निवडणूक बहुमताने जिंकण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यासाठी दोन्ही जिह्याचे गटाध्यक्ष, गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आराखड्याची  काटेकोर अंमलबजावणी करून 2027च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक बूथवर किमान 50 टक्के मिळविण्याचा संकल्प करावा. भाजपच्या डबल इंजिन सरकारने देशात आणि राज्यातही जी विकासकामे केली, त्या विकासकामांच्या आधारावर जनतेपर्यंत पोहचावे. भाजप सरकारने गोव्यात 33 हजार कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. त्याचशिवाय महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचीही माहिती जनतेला देऊन त्या आधारावर राज्यात पुन्हा एकदा भाजपला बहुमताने जिंकून आणण्याचे शिवधनुष्य गटाध्यक्षांनी पेलावे, असेही ते म्हणाले.

गोवा मुक्तीला 14 वर्षे उशीर का म्हणून : नबीन

काँग्रेस पक्षावर आरोप करताना नितीन नबीन म्हणाले की, काँग्रेसने अनेक दशके राज्य करूनही सामान्य लोकांसाठी एकही योजना राबवली नाही. सामान्य नागरिकांपर्यंत सोयी-सुविधा पोहचविण्याऐवजी सरकारी निधीमध्ये भ्रष्टाचारच केला आहे. पूर्वीच्या काँग्रेस सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती द्यावी. भारत स्वातंत्र्यानंतर गोवा मुक्तीला 14 वर्षे उशीर कोणत्या नेत्यामुळे झाला, हे देखील भाजपच्या गटाध्यक्षांनी जनतेमध्ये जाऊन सांगावे. कारण काँग्रेस हा घोटाळा करणारा तर भाजप पक्ष हा विकास साधणारा पक्ष आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

राजनीती लाँग मॅरेथॉन; म्हणून स्टॅमिना वाढवा

शिस्त, समर्पण आणि निर्धाराने पक्षसंघटनेसह देशाला पुढे नेण्याचे काम आपण करूया. कारण ‘राजनीती ही लाँग मॅरेथॉन’ आहे. राजकारण हे मॅरेथॉनसारखे असल्याने वेगापेक्षा स्टॅमिना महत्त्वाचा असतो, हे कार्यकर्त्यांनी समजून घेऊन 2037 पर्यंत गोवा राज्य हे विकसित राज्य म्हणून उदयास आणण्यासाठी साथ द्यावी, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे नेते पार्टटाईम नेते

काँग्रेसचे नेते हे पार्टटाईम नेते आहेत. ते केवळ निवडणुकीतच लोकांसमोर येतात, असा आरोप करताना नितीन नबीन गोवा राज्य भाजपसाठी नेहमीच शुभ राहिले आहे. 2012 मध्ये गोव्यात भाजप सत्तेवर आला आणि त्यानंतर केंद्रातही भाजपने 2014 मध्ये सत्ता स्थापन केली. ज्या-ज्या वेळी गोव्यात भाजपच सत्तेवर येत आहे, त्या-त्या वेळी केंद्रातही भाजपचेच सरकार बनते. त्यामुळे 2027च्या गोवा विधानसभा निवडणुकीत राज्य आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे केंद्र सरकार स्थापन होऊन पुन्हा एकदा कमळ फुललेच दिसणार आहे.  गेल्या 14 वर्षांत गोव्यात भाजपने अनेक विकासकामे केली आहेत. येथे विमानतळ, महामार्ग, उ•ाणपूल बांधण्यात आले आहेत. भाजप सरकार ‘अंत्योदय‘ तत्त्वावर काम करत आहे. सुशासन देण्यासह राष्ट्रनिर्माणाचे काम देखील भाजप करत आहे, असेही ते म्हणाले.

गोव्यातील प्रत्येक कार्यकर्ता जिंकण्यासाठी तयार : मुख्यमंत्री

गोवा राज्यात निर्विवादपणे भाजपला विजय मिळवून देण्यासाठी कार्यकर्ता झटत आहे. 2027 आणि 2029 या दोन्ही निवडणुकीत भाजपला जिंकून आणण्यासाठी राज्यातील प्रत्येक कार्यकर्ता नियोजनबद्ध तयार आहे. त्यामुळे केंद्रातील नेतृत्वाने नि:संदेह गोव्याच्या बाबतीत निश्चिंत रहावे. गोव्यातील प्रत्येक कार्यकर्ता भाजपला पुन्हा एकदा विजय मिळवून देण्यासाठी आतापासूनच तयारीला लागला आहे, असा निरोप आपणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यावा, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना गोव्यातील राजकीय स्थितीची माहिती देताना सांगितले. नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार तत्त्वावर सरकारने विकासकामे केली असल्याने येणाऱ्या 2027 आणि 2029 या दोन्ही निवडणुकीत गोव्यात भाजपला भरघोस यश प्राप्त होईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

भारताला विश्वगुरु करण्यासाठी झटा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून योग्य मार्गदर्शन केलेले आहे. 24 तास लोकसेवेसाठी म्हणून ओळखले जाणारे नितीन नबीन हे देशाला मिळालेले युवा नेतृत्व आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगात विश्वगुरु बनविण्यासाठी बाळगलेले स्वप्न गोवा राज्यातील नेते आणि कार्यकर्ते पूर्ण करतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मार्गदर्शनानुसार, येत्या विधानसभा निवडणुकीत 27 जागा जिंकण्याचे ध्येय पूर्ण करावे. तसेच देशात सलग चौथ्यांदा केंद्रातील भाजप सरकार स्थापनेसाठी राज्यातील कार्यकर्त्यांनी हातभार लावावा, असे आवाहन गोव्याचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी उपस्थितांना केले.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी स्व. भाऊसाहेब बांदोडकर आणि स्व. मनोहर पर्रीकर यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.

Advertisement
Tags :

.