तीन राज्यांमध्ये भाजप दणदणीत !
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये कमळ, तेलंगणाने राखली काँग्रेसची बूज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. या तीन्ही राज्यांमध्ये यश मिळवून पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारणाच्या मध्यवर्ती स्थानी येण्याचे काँग्रेसचे स्वप्न भाजपच्या या झंझावातात विझून गेले आहे. तेलंगणात मात्र काँग्रेसने के. चंद्रशेखर राव यांच्या ‘भारत राष्ट्र समिती’ या पक्षाला सत्तेवरुन दूर केले असून या राज्यात प्रथमच सत्ता मिळविली आहे.
ताज्या वृत्तानुसार राजस्थानात भारतीय जनता पक्षाने 199 मतदारसंघांपैकी 115 स्थानांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला 70 स्थानांवर समाधान मानावे लागले असून इतर पक्ष आणि अपक्षांना 14 जागांवर यश मिळाले आहे. राजस्थानात 200 जागा असून एका जागेवरील निवडणूक उमेदवाराच्या निधनामुळे रद्द करण्यात आली होती. मध्यप्रदेशात भाजपने आपली दुसरी सर्वाधिक आमदारसंख्या नोंदविली असून 230 पैकी 167 स्थानांवर विजय मिळविला आहे. काँग्रेसला केवळ 62 तर इतरांना अवघी एक जागा मिळाली. छत्तीसगडमध्ये भाजपला 90 पैकी 55 स्थानांवर यश मिळाले असून काँग्रेसला केवळ 35 जागा आहेत. तेलंगणात काँग्रेसने घवघवीत यश मिळविले असून 119 पैकी 67 जागा घेतल्या आहेत. मावळता सत्ताधारी पक्ष भारत राष्ट्र समितीला 40 जागा मिळाल्या असून भारतीय जनता पक्षाने 10 जागांवर विजय मिळविल्याचे दिसत आहे.
पाच राज्यांमध्ये निवडणुका
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये 7 नोव्हेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत विधानसभा निवणुकांसाठी मतदान घेण्यात आले होते. या पाच पैकी चार राज्यांमधील मतगणना रविवारी करण्यात आली. मिझोराममध्ये ती आज सोमवारी होणार आहे. मतगणना झालेल्या चार राज्यांपैकी उत्तरेतील तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेससह इतर सर्व छोट्या पक्षांना धूळ चारत आपले वर्चस्व पुनर्स्थापित केले आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची पूर्ण बहुमताची सरकारे होती. मध्यप्रदेशात भाजपचेच सरकार होते. ते स्वत:कडेच राखत भाजपने काँग्रेसची ही दोन्ही राज्ये स्वत:कडे खेचून घेतली आहेत. काँग्रेसला हा मोठाच धक्का आहे.
राजस्थानने राखली परंपरा
1993 पासून गेली 30 वर्षे राजस्थानच्या मतदारांनी एकदाही एका पक्षाला सलग दुसऱ्यांना विधानसभा निवडणुकीत निवडून दिलेले नाही. ही पंरपरा याही निवडणुकीत राखली गेली आहे. ही परंपरा तोडण्याचे काँग्रेसचे प्रयत्न वाया गेले. आता पुन्हा राज्यात भाजपने आपले स्थान भक्कम केले आहे.
प्रस्थापित विरोधी भावना नाही
मध्यप्रदेशमध्ये 2003 पासून केवळ दीड वर्षांचा अपवाद वगळता सलग भाजपचे सरकार आहे. तथापि, यावेळीही कोणतीही प्रस्थापितविरोधी भावना दिसून आलेली नाही. यावेळी तर राज्यात आतापर्यंत कधीही झाले नव्हते, असे विक्रमी मतदान झाले होते. मात्र, भाजपने अनेकांच्या अनुमानांना गुंगारा देत येथे सणसणीत विजय प्राप्त केला. हा परिणाम अनेकांच्या अपेक्षा भंग करणारा ठरला आहे.
छत्तीसगडमध्ये पुन्हा कमळ
छत्तीसगडमध्येही मध्यप्रदेशप्रमाणेच 2003 पासून सलग 15 वर्षे भाजपचे राज्य होते. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. तथापि, दीड वर्षात काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी 18 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार कोसळले होते. या घडामोडींमुळे यंदा काय होणार यासंबंधी उत्सुकता होती. तथापि, या राज्यातील मतदारांनी भाजपवरच आपला विश्वास असल्याचे सिद्ध करत भाजपला प्रचंड विजयाचा धनी केले आहे. त्यामुळे गुजरातपाठोपाठ या राज्यातही भाजपची सत्ता दोन दशकांहून अधिक काळ राहणार आहे.
एक्झिट पोलचा ‘सफाया’
या पाच राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर 30 नोव्हेंबरला देशातील अनेक सर्वेक्षण संस्थांनी त्याच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष सादर केले होते. त्यांच्यापैकी काही अपवाद वगळता सर्व सर्वेक्षणांचा धुव्वा उडाल्याचे दिसत आहे. कोणत्याही सर्वेक्षणात भारतीय जनता पक्षाला छत्तीसगडमध्ये सत्ता मिळेल असे दर्शविण्यात आले नव्हते. त्यामुळे या राज्याच्या संदर्भात ही सर्वेक्षणे सपशेल आपटली आहेत. केवळ दोन संस्था वगळता अन्य कोणीही मध्यप्रदेशात भाजपला इतके मोठे यश मिळेल असे अनुमान व्यक्त केले नव्हते. तसेच किमान चार संस्थांनी भाजप मध्यप्रदेश हारणार असे संकेत दिले होते. ही सर्व भाकिते खोटी ठरली आहेत. राजस्थानसंबंधी अनुमाने काही प्रमाणात खरी ठरली असली तरी अचूक वेध घेण्यात ती अशयस्वी ठरली. तेलंगणात मात्र सत्तापरिवर्तन होणार हा सर्व सर्वेक्षणांचा होरा खरा ठरला आहे. पण एकंदरित पाहता या सर्वेक्षणांना आपली विश्वासार्हता टिकविता न आल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीवर परिणाम ?
हिंदी पट्ट्यातील भाजपच्या विजयाचा लोकसभा निवडणुकांवर कोणता परिणाम होईल याची आता चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकांमधील यशापयशाचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होतोच असे नाही, असे आजवरच्या अनेक निवडणुकांमधून दिसून आले आहे. 2018 मध्ये ही तीन्ही राज्ये भाजपने गमावली होती. तथापि, त्यानंतर सहा महिन्यांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या तीन राज्यांमधील 65 पैकी 62 जागा जिंकून घवघवीत यश मिळविले होते.
पंतप्रधान मोदींचा निर्विवाद प्रभाव
या पाच राज्यांमध्ये भाजपने कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावे मते मागण्याचे भाजपचे धोरण होते. हे धोरण अत्याधिक यशस्वी झाल्याने विरोधकांची चांगलीच कोंडी झाली आहे. आता, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या प्रभावाला कसे तोंड द्यायचे, हा मोठाच प्रश्न विरोधकांसमोर उभा असून त्याचे उत्तर मिळविणे सोपे नाही, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मावळते आणि भावी मुख्यमंत्री भाजपकडून पराभूत
तेलंगणाच्या कामारेड्डी मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी यांनी मावळते मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि भावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी यांचा पराभव करुन वैशिष्ट्यापूर्ण विजय मिळविला आहे. भाजपला या राज्यात केवळ 10 जागा मिळाल्या असल्या तरी या हा विजय हा मोठ्याच चर्चेचा विषय झाल्याचे दिसत आहे.