For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबमध्ये ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत भाजप

07:00 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
पंजाबमध्ये ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत भाजप
Advertisement

अकाली दलासोबत आघाडीची चर्चा : भाजप लढविणार अधिक जागा

Advertisement

वृत्तसंस्था/चंदीगड

पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल 25  वर्षांपर्यंत आघाडी अंतर्गत निवडणूक लढवत राहिले होते. परंतु 2020 मधील शेतकरी आंदोलनादरम्यान ही अडीच दशके जुनी मैत्री तुटली होती. आता 2027 च्या निवडणुकीकरता अकाली दल आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजप यावेळी अकाली दलापेक्षा अधिक जागा लढविण्यासाठी आग्रही आहे. 1997 पासून 2017 पर्यत झालेल्या विधानसभा आणि 1996-2019 पर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि अकाली दलाने आघाडी केली होती. यादरम्यान पंजाबमध्ये अकाली दल नेहमीच ‘मोठ्या भावा’च्या तर भाजप ‘छोट्या भावा’च्या भूमिकेत राहिला, परंतु आता चित्र बदलले आहे. पंजाबमध्ये भाजपची संघटनात्मक शक्ती वाढली आहे. याचमुळे भाजप आता पंजाबमध्ये पूर्वीप्रमाणे अकाली दलाच्या छोट्या भावाच्या भूमिकेत राहू इच्छित नाही, तर अधिक जागा मिळवू पाहत आहे. याचमुळे भाजपची बार्गेनिंग पॉवर बदलली आहे.

Advertisement

55 जागांची मागणी

पंजाबमध्ये भाजप स्वबळावर सर्व 117 जागा लढविणार असल्याचा दावा करतोय. परंतु दुसरीकडे भाजप अकाली दलाकडून 55 जागांची मागणी करत असल्याचे समजते. तर अकाली दलाने भाजपकरता 45 जागा सोडण्याची तयारी दर्शविली. पंजाबमध्ये भाजप अन् अकाली दलादरम्यान जागावाटपाचे हे सूत्र सत्तेच्या जुन्या समीकरणात एका मूलभूत बदलाच संकेत आहे. 2022 च्या निवडणुकीपूर्वी भाजप पंजाबमध्ये केवळ 23 जागाच लढवत होता. पंजाबमध्ये 1997 च्या निवडणुकीत भाजप अन् अकाली दलाने प्रथम आघाडी केली होती. तेव्हापासून 2017 पर्यत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप 23 जागाच लढवत राहिला, तर अकाली दल 94 जागा लढवत होता.

Advertisement
Tags :

.