हरियाणात भाजप, जम्मू-काश्मीरात युती
विधानसभा निवडणुकांचे परिणाम घोषित, काँग्रेसला अनपेक्षित धक्का, एक्झिट पोल धाराशायी
वृत्तसंस्था / चंदीगढ, श्रीनगर
हरियाणात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजयाची हॅटट्रिक केली आहे. हा पक्ष आता या राज्यात सलग तीनदा सरकार स्थापन करणार आहे. तर जम्मू-काश्मीर या केंदशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीने पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मंगळवारी मतगणना करण्यात आली. रात्रीपर्यंत सर्व परिणाम घोषित झाले. हरियाणातल्या प्रचंड विजयासाठी आणि जम्मू-काश्मीरमधील उत्तम कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व कार्यकर्ते आणि मतदारांचे अभिनंदन केले आहे.
हरियाणात भारतीय जनता पक्षाने शानदार विजय मिळविला आहे. या पक्षाने विधानसभेच्या 90 जागांपैकी 48 जागांवर विजय मिळविला असून स्वबळावर पूर्ण बहुमत प्राप्त केले आहे. यशस्वी होण्याच्या अपेक्षेत असलेल्या काँग्रेसला मोठाच धक्का बसला असून केवळ 37 जागांवर समाधान मानावे लागले. हरियाणात प्रादेशिक पक्षांचा धुव्वा उडाला असून त्यांच्या पदरात केवळ दोन जागा पडल्या. जम्मू-काश्मीरात मात्र अपेक्षेनुसार नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस यांच्या युतीला मोठे यश मिळून बहुमत मिळाले. या युतीने 90 पैकी 47 जागांवर विजय मिळविला. या 47 जागांपैकी 41 जागा नॅशनल कॉन्फरन्सला तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. पीडीपीला केवळ 3 जागांवर यश मिळाले. आम आदमी पक्षाने या केंद्रशासित प्रदेशात आपले खाते उघडण्यात यश मिळविले आहे.
काँगेसकडून परिणामांवर आक्षेप
हरियाणातील परिणाम आम्ही नाकारत आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी व्यक्त केली. आम्ही या परिणामांच्या विरोधात आवाज उठविणार आहोत. हे परिणाम जनभावनेच्या विरोधात आहेत. आम्हाला ते मान्य नाहीत. भारतीय जनता पक्षाने काहीतरी गडबडघोटाळा केला आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनीही अशीच विधाने केली.
रडवेपणा सोडून द्या
हरियाणातील निवडणूक परिणामांवर काँग्रेसने लावलेला नकारात्मक सूर त्या पक्षाची संकुचित मानसिकता सिद्ध करतो. आपला पराभव झाला की काँग्रेस नेहमीच काहीतरी घोटाळा आहे असा हास्यास्पद आरोप करते. त्यांनी हा रडवेपणा सोडून द्यावा आणि निवडणूक परिणामांचा खिलाडू वृत्तीने स्वीकार करावा. त्यातच शहाणपण आहे, अशी खोचक टीका भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर केली आहे.
ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होणार
जम्मू-काश्मीरचा निवडणूक परिणाम हा आमच्या बाजूने मिळालेला जनादेश आहे, अशी प्रतिक्रिया या प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केली. आपले पुत्र ओमर अब्दुल्ला हेच या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा त्यांनी सर्व परिणाम घोषित होण्याच्या आतच करुन टाकली.
भाजपच्या आनंदाला उधाण
हरियाणातल्या विजयाच्या हॅटट्रिकमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला अक्षरश: उधाण आले होते. चंदीगढ आणि दिल्ली येथील या पक्षाची मुख्यालये दुपारी 12 नंतर कार्यकर्ते आणि नेते यांनी गजबजून गेली होती. हरियाणात ज्या मतदारसंघांमध्ये या पक्षाचा विजय दिसत होता तेथे फटाक्यांची आतषबाजी होत होती. विजयी घोषित उमेदवारांच्या मोठ्या मिरवणुकाही रात्री राज्यभर काढण्यात आल्या होत्या. दिल्लीतील पक्षाचे राष्ट्रीय मुख्यालय आणि विविध राज्यांमधील मुख्यालयांमध्येही कार्यकर्ते आणि नेत्यांनी फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई भरवून मनसोक्त आनंद व्यक्त रात्री उशीरापर्यंत व्यक्त केला. जम्मू येथेही या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुका काढून आनंद साजरा केला.
प्रथम जल्लोष, नंतर सन्नाटा
हरियाणातील मतगणनेला मंगळवारी सकाळी आठ वाजता प्रारंभ करण्यात आला. मात्र, प्रारंभीचा दीड तास काँग्रेसचे उमेदवार अनेक मतदारसंघात आघाडीवर असल्याचे दिसत होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी हरियाणा आणि दिल्लीतही जल्लोष करण्यास प्रारंभ केला होता. तथापि, त्यानंतर परिस्थिती नेमकी उलट फिरली. काँग्रेस त्यानंतरच्या दोन तासांमध्ये क्रमाक्रमाने पिछाडीवर केली आणि भारतीय जनता पक्ष बहुमत मिळविणार असा रांगरंग दिसू लागला. हाच कल शेवटी मतगणना पूर्ण होईपर्यंत टिकला. त्यामुळे चंदीगढ आणि दिल्लीतील काँग्रेस कार्यालयांमधील उत्साह मावळून तेथे सन्नाटा निर्माण झाल्याचे दिसत होते. काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मोठ्या प्रमाणात हळहळताना दिसून येत होते.
विनेश फोगट विजयी
भारताची ख्यातनाम कुस्तीपटू आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेती विनेश फोगाट हिने हरियाणातील जुलाना मतदारसंघात निसटता विजय मिळविला आहे. मतगणनेचा प्रारंभ झाल्यानंतर ती बराच काळ मागे होती. तथापि, शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये तिने पिछाडी भरुन काढून 6,115 मतांची आघाडी घेतली आणि तिचा विजय झाला. तिने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला.
परत पाठविले ढोलकीवादक
एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसचा मोठा विजय होईल, असे भाकित करण्यात आले होते. मंगळवारी मतगणनेचा प्रारंभ झाल्यानंतरही काही काळ असेच दिसत होते. म्हणून काँग्रेसने आपल्या कार्यालयांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यासाठी ढोलकीवादकांना आमंत्रित केले होते. आमंत्रणाप्रमाणे ते पोहचलेही होते. पण तोपर्यंत काँग्रेसच्या दृष्टीने फासे उलटे पडले होते. त्यामुळे ढोलकीवादकांना ‘पुढच्या वेळी बोलावू’ असे सांगून परत पाठविण्यात आले.
काश्मीरात 10 वर्षांनी निवडणूक
ही विधानसभा निवडणूक जम्मू-काश्मीरातील गेल्या दहा वर्षांमधील प्रथमच विधानसभा निवडणूक होती. ती अतिशय शांततेत पार पडली. मतदानही भरघोस झाले. इतक्या शांततेत पार पडलेली ही या प्रदेशातील प्रथमच निवडणूक आहे, असे मत अनेक राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण निवडणूक काळात एकही दहशतवादी हल्ला किंवा हत्या असे प्रकार घडले नाहीत. हे प्रशासनाचे मोठे यश आहे, अशीही प्रतिक्रिया अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाचा काँग्रेसवर पलटवार
हरियाणातील निवडणुकीत काहीतरी घोटाळा झाला आहे, या काँग्रेसच्या आरोपाचा केंद्रीय निवडणूक आयोगाने अतिशय कठोर शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. निवडणुकीचा परिणाम आपल्या बाजूने लागला नाही की अशी आरडाओरड करण्याची काही पक्षांना सवय लागली आहे. मात्र, आयोगाने आपले कर्तव्य चोखपपणे आणि नि:पक्षपातीपणाने पार पडले असून सर्व आरोप बिनबुडाचे आणि धादांत खोटे आहेत, असा पलटवार केंद्रीय निवडणूक आयोगाने केला आहे.
विविध प्रदेशांमध्ये भिन्न चित्र
हरियाणाचे राजकीयदृष्ट्या चार भाग असून या चारही भागांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँगेस यांना भिन्न प्रमाणात यश मिळाले आहे. ते पुढीलप्रमाणे
- जाट बहुल भाग 17 जागा भाजप 6 काँग्रेस 9
- अहिरवाल क्षेत्र 28 जागा भाजप 21 काँग्रेस 7
- कुरुक्षेत्र भाग 27 जागा भाजप 15 काँग्रेस 12
- बागड भाग 19 जागा भाजप 6 काँग्रेस 9
जम्मू-काश्मीरमध्येही हिंदू बहुल भागात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. तर मुस्लीम बहुल भागात नॅशनल कॉन्फरन्सला मोठे यश मिळाले
- हिंदूबहुल जम्मू भाग जागा 43 भाजप 29 नेकॉयुती 11
- मुस्लीम बहुल भाग जागा 47 भाजप 0, नेकॉयुती 41
आकडे काय सांगतात...
हरियाणा - एकंदर जागा 90
- भारतीय जनता पक्ष 48 (मते 39.96 टक्के)
- केँग्रेस 37 (मते 39.04 टक्के)
- इतर 05 (मते 21 टक्के)
जम्मू-काश्मीर-एकंदर जागा 90
- नॅशलन कॉन्फरन्स 42 (मते 23.43 टक्के)
- काँग्रेस 06 (मते 11.97 टक्के)
- भारतीय जनता पक्ष 29 (मते 25.64 टक्के)
- पीडीपी 03 (मते 8.86 टक्के)
- अपक्ष, इतर 10 (मते 30.10 टक्के)
परिणाम काय संभावतात...
- आता पाठोपाठ महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्रपक्षांना हरियाणातील विजय आणि जम्मूतील कामगिरीचा लाभ मिळू शकतो.
- लोकसभेच्या निवडणुकीनंतरच्या या प्रथमच निवडणुका होत्या. भारतीय जनता पक्षाने समाधानकारक कामगिरी केल्याने या पक्षाचे नितीधैर्य अधिक उंचावू शकते. लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत न मिळाल्याची खंत काही प्रमाणात दूर होईल.
- महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काँग्रेसची ‘बार्गेनिंग पॉवर’ या परिणामांमुळे कमी होऊ शकते. त्यामुळे या राज्यांमधील काँग्रेसचे मित्रपक्ष काँग्रेसवर जास्त जागा त्यांच्यासाठी सोडण्याचा दबाव टाकू शकतात. तडजोड करावयास लावू शकतात.
- भारतीय जनता पक्षाने चमकदार कामगिरी केल्याने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हा पक्ष त्याच्या मित्रपक्षांच्या मनात विश्वास निर्माण करु शकतो. तसेच जागावाटतापही या पक्षाला या कामगिरीचा लाभ होण्याची शक्यता आहे.
- केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकार या दोन राज्यांमधील परिणामांमुळे अधिक सुस्थिर होऊ शकते. या सरकारात सहभागी असणाऱ्या प्रादेशिक पक्षांमध्ये भारतीय जनता पक्षासंबंधी अधिक विश्वास निर्माण होऊ शकतो.
- सरळ लढतील भारतीय जनता पक्षासमोर आजही काँग्रेस पक्ष कमकुवत असल्याचा संकेत या परिणामांमधून मिळतो. त्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीत काँग्रेस पक्षाचे स्थान कमकुवत होऊन मित्रपक्षांचा विश्वास कमी होऊ शकतो.
- या दोन राज्यांमधील उत्तम कामगिरीमुळे भारतीय जनता पक्षाला एकंदरीत देशाच्या पातळीवर भावनिक लाभ होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही पूर्वीप्रमाणेच प्रभावी असल्याचे दिसून आल्याने या पक्षाचा उत्साह वाढू शकतो.