For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपला सर्वाधिक; पण 8 जागांची घट

06:22 AM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपला सर्वाधिक  पण 8 जागांची घट
BJP workers celebrate the victory in LS Poll at BJP office Jaganath Bhavan in Bengaluru on Tuesday. -KPN ### BJP workers celebrate the victory
Advertisement

भाजपला 17, निजदला 2 जागा : काँग्रेसची 9 जागांवर मजल

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

कमालीची उत्सुकता असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. विधानसभा निवडणूक निकालाप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतही क्लिन स्वीप होईल, अशी अपेक्षा असलेल्या काँग्रेस नेत्यांची निराशा झाली आहे. काँग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत. तर 20 ते 22 जागा जिंकण्याची आशा असलेल्या भाजपला मागील निवडणुकीपेक्षा यावेळी 8 जागा कमी मिळाल्या आहेत. भाजपने निजदशी युती केली असून भाजपला 17 तर निजदला 2 जागा मिळाल्या आहेत. हा निकाल म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती म्हणावी लागेल. कारण तिन्ही पक्षांना 2014 मध्ये आताच्या निवडणुकीइतक्याच जागा मिळाल्या होत्या.

Advertisement

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने 28 जागा लढवत 25 मतदारसंघांवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. यावेळी निधर्मी जनता दलासोबत युती केल्याने भाजपने 25 जागांवर उमेदवार दिले. त्यापैकी 17 उमेदवार निवडून आले आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली होती. यावेळी या पक्षाने 9 जागा मिळवत आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

तीन माजी मुख्यमंत्री विजयी

यावेळी कर्नाटकातून तीन माजी मुख्यमंत्र्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली. त्यात भाजपचे दोघे आणि निजदच्या एकाचा समावेश आहे. बेळगावमधून जगदीश शेट्टर, हावेरीतून बसवराज बोम्माई आणि एच. डी. कुमारस्वामी या तीन माजी मुख्यमंत्र्यांनी विजय मिळविला आहे. त्याचप्रमाणे भाजपमधून निवडणूक लढविलेल्या चारपैकी तीन माजी मंत्र्यांनाही मतदारांनी लोकसभेवर पाठविले आहे. चिक्कबळ्ळापूरमधून डॉ. के. सुधाकर यांनी काँग्रेसचे रक्षा रामय्या यांना पराभूत केले. माजी मंत्री गोविंद कारजोळ यांनी चित्रदुर्गमधून काँग्रेसच्या माजी खासदार बी. एम. चंद्रप्पा यांचा पराभव केला. तुमकूरमध्ये माजी मंत्री व्ही. सोमण्णा यांनी देखील माजी खासदार मुद्दहनुमेगौडा यांना पराभवाची धूळ चारली आहे. परंतु, भाजपच्या बी. श्रीरामुलू यांना काँग्रेसचे आमदार ई. तुकाराम यांच्याकडून पराभूत व्हावे लागले आहे.

केंद्रीय मंत्र्याचा पराभव

बिदरमध्ये मंत्री ईश्वर खंडे यांचे पुत्र सागर खंड्रे यांनी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांना पराभवाचा धक्का दिला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार के. एस. ईश्वरप्पा यांच्यामुळे शिमोग्यात तिरंगी लढत झाली होती. शिमोग्यात माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी बाजी मारली आहे. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार असणाऱ्या गीता शिवराजकुमार यांनाही पराभूत केले. ईश्वरप्पा या मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

खर्गेंचे जावई विजयी

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना त्यांच्या जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांना निवडून आणण्यात सपशेल अपयश आले आहे. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुलबर्ग्यात पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यात यश मिळविले आहे. गुलबर्गा येथे मल्लिकार्जुन खर्गे यांचे जावई राधाकृष्ण दोडमनी यांनी भाजपचे विद्यमान खासदार डॉ. उमेश जाधव यांना चित केले. उमेश जाधव हे खर्गेंचे माजी शिष्य असून त्यांनीच खर्गेंना 2019 च्या निवडणुकीत पराभूत केले होते. म्हैसूरमध्ये सिद्धरामय्या यांनी काँग्रेसचे उमेदवार एम. लक्ष्मण यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. पण, भाजपचे उमेदवार असणारे म्हैसूर राजघराण्याचे यदूवीर वडेयर यांच्याकडून लक्ष्मण यांना पराभव पत्करावा लागला आहे.

डी. के. शिवकुमार यांना धक्का : देवेगौडांचे जावई वरचढ

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेंगळूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला आहे. प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी काँग्रेसचे उमेदवार डी. के. सुरेश यांना 2,69,647 मतफरकाने पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे हॅट्ट्रिकवीर सुरेश यांचे चौथ्यांदा लोकसभेत प्रवेश करण्याचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना हा निकाल जबर धक्का मानला जात आहे.

सलग पाच वेळा भाजपला सर्वाधिक जागा

राज्यात काँग्रेसची सत्ता आणि गॅरंटी योजना जारी करूनदेखील राज्यातील जनतेने भाजपला अधिक जागा दिल्या आहेत. कर्नाटकात भाजपला सलग पाच वेळा सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मात्र, 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी आठ जागांनी घट झाली आहे. मागील 25 वर्षांपासून काँग्रेसला कर्नाटकातून दोनअंकी जागा मिळविता आलेल्या नाहीत. दुसरीकडे भाजपशी हातमिळवणी केलेल्या निजदने तीन जागा लढवून दोन जागा मिळविल्या आहेत.

श्रीरामुलू पराभूत, संडूरमध्ये पोटनिवडणूक

भाजपकडून बळ्ळारी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविलेल्या माजी मंत्री बी. श्रीरामुलू यांची मात्र, निराशा झाली आहे. त्यांना काँग्रेसच्या ई. तुकाराम यांनी पराभूत केले. ई. तुकाराम यांनी श्रीरामुलूंना 98,992 मतफरकाने पराभूत केले आहे. तुकाराम यांना 7,30,845 तर श्रीरामुलू यांना 6,31,853 मते मिळाली आहेत. ई. तुकाराम हे बळ्ळारीच्या संडूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. ते वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. ते लोकसभेवर निवडून आल्याने संडूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार हे निश्चित.

Advertisement
Tags :

.