For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपला कर्नाटकात मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही

01:11 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपला कर्नाटकात मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही
Advertisement

एआयसीसी कार्यदर्शी रणदीप सुरजेवाला यांचा केंद्रावर निशाणा

Advertisement

बेळगाव : केंद्र सरकारकडून कर्नाटक राज्याबाबत नेहमीच दुटप्पी धोरण अवलंबण्यात आले आहे. राज्यामध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असताना राज्याच्या मागणीनुसार भरपाई देणे आवश्यक होते. मात्र ही भरपाई देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. या ऐवजी केंद्र सरकारने मोकळा चंबू देऊन राज्यातील जनतेवर अन्याय केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना कर्नाटकमध्ये येवून मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यदर्शी व कर्नाटक राज्य प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी केंद्र सरकारवर करून निशाना साधला.

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. केंद्र सरकारकडून कर्नाटकवर अन्याय करण्यात आला आहे. राज्याच्या विकासाला आवश्यक असणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणीतही पक्षपात करण्यात आला आहे. राज्याला पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाची मेकेदाटू योजना यासह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कळसा-भांडुरा योजना राबविण्यातही दुर्लक्ष करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पर्यावरणासंदर्भातील परवानगी देणे आवश्यक होते. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळेच अशा महत्त्वाकांक्षी योजना रखडल्या आहेत. याला केंद्र सरकार जबाबदार आहे. राज्यामध्ये यंदा पावसाअभावी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती निभावून नेण्यासाठी राज्य सरकारकडून जनतेच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे 18 हजार कोटींची भरपाईची मागणी करण्यात आली होती. ती भरपाई देण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला कर्नाटकात येवून मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, असे सुरजेवाला यांनी सांगितले.

Advertisement

भाजपकडून नेहमीच तोडा आणि जोडा नीती अवलंबून राजकारण करण्यात येत आहे. हुबळी येथे तरुणीच्या हत्येचे राजकारण भाजपने सुरू केले आहे. ही अत्यंत खंडनीय बाब आहे. तरुणीच्या हत्येनंतर राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अशा प्रकरणांचा तातडीने निकाल लागावा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी कायद्याच्या चौकटीत न्याय व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आहे. असे असताना भाजप मात्र या विषयाचे राजकारण करत असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते अंडी विकून निर्माण करण्यात आलेल्या हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहेत. मुलांना वितरित करण्यात येणाऱ्या अंड्यांमध्ये गैरकारभार करून हे भव्य हॉटेल निर्माण करण्यात येत आहे. त्यामध्ये मोदी वास्तव्य करणार आहेत, अशी व्यंगात्मक टीकाही त्यांनी केली. यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार राजू सेठ, गणेश हुक्केरी, अशोक पट्टण, महांतेश कौजलगी, लक्ष्मण सवदी, चन्नराज हट्टीहोळी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.