For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिक्षक, पदवीधर निवडणुकीत भाजपला दणका

06:42 AM Jun 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिक्षक  पदवीधर निवडणुकीत भाजपला दणका
Advertisement

विधानपरिषदेवर काँग्रेसचे तीन, निजदचे दोन तर भाजपचा एक उमेदवार विजयी

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत भाजपला दणका बसला आहे. भाजपचे चारपैकी केवळ एकच उमेदवार निवडून आला आहे.  3 जून रोजी तीन शिक्षक आणि तीन पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान झाले होते.  गुरुवारी सकाळी सुरू झालेली मतमोजणी शुक्रवारी सकाळपर्यंत सुरू होती. सकाळी 11 वाजता अखेरचा निकाल हाती लागला असून राज्यातील सत्ताधारी काँग्रेसला 3, निजदला 2 आणि भाजपला एक जागा मिळाली आहे.

Advertisement

बेंगळूर पदवीधर मतदारसंघ, आग्नेय शिक्षक मतदारसंघ, ईशान्य पदवीधर  मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांनी बाजी मारली आहे. तर दक्षिण शिक्षक मतदारसंघ आणि नैर्त्रुत्य शिक्षक मतदारसंघात निजदचे उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपला केवळ नैर्त्रुत्य पदवीधर मतदारसंघात विजय मिळविता आला आहे.

विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी भाजप-निजदने युती केली होती. भाजपने चार तर निजदने दोन जागा लढविल्या होत्या. काँग्रेसने सहा उमेदवार दिले. निजदने लढविलेल्या दोन्ही जागांवर विजय मिळविला. तीन दशकांहून अधिक काळ भाजपचा बालेकिल्ला असणारा बेंगळूर पदवीधर मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला आहे. येथे काँग्रेसचे रामोजीगौडा यांनी भाजप उमेदवार ए. देवेगौडा यांना पराभूत केले आहे. येथे 36 वर्षांनंतर काँग्रेसने विजय प्राप्त केला आहे.

आग्नेय शिक्षक मतदारसंघातही भाजप पराभूत झाला आहे. मागील तीन निवडणुकांमध्ये येथे भाजपने वर्चस्व राखले होते. काँग्रेसचे उमेदवार डी. टी. श्रीनिवास यांनी भाजपच्या नारायणस्वामी यांना पराभूत करत विधानपरिषदेत प्रवेश केला आहे.

नैर्त्रुत्य पदवीधर मतदारसंघात भाजपचे डॉ. धनंजय सर्जी यांनी काँग्रेसच्या आयनूर मंजुनाथ यांच्यावर मात केली. त्यामुळे मंजुनाथ यांचे विधान परिषदेत पुन्हा प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले आहे. याच मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवार रघुपती भट तिसऱ्या स्थानी राहिले.

दक्षिण मतदारसंघात निजदचे विवेकानंद यांनी काँग्रेसच्या मरितिब्बेगौडा यांना पराभूत केले. नैर्त्रुत्य शिक्षक मतदारसंघात निजदचे एस. एल. भोजेगौडा यांनी काँग्रेसच्या के. के. मंजुनाथ यांच्यावर विजय मिळविला. ईशान्य पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या चंद्रशेखर यांनी भाजप उमेदवार अमरनाथ पाटील यांना पराभूत केले.

काँग्रेसने बेंगळूर दक्षिण शिक्षक मतदारसंघातून मारितिब्बेगौडा, नैर्त्रुत्य पदवीधर मतदारसंघातून आयनूर मंजुनाथ, आग्नेय शिक्षक मतदारसंघातून डी. टी. श्रीनिवास, बेंगळूर पदवीधर मतदारसंघातून रामोजी गौडा, ईशान्य पदवीधर मतदारसंघातून चंद्रशेखर बी. पाटील, नैर्त्रुत्य शिक्षक मतदारसंघातून के. के. पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने ईशान्य पदवीधर मतदारसंघातून अमरनाथ पाटील, नैर्त्रुत्य पदवीधर मतदारसंघातून डॉ. धनंजय सर्जी, बेंगळूर पदवीधर मतदारसंघातून ए. देवेगौडा, आग्नेय शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य वाय. ए. नारायणस्वामी, दक्षिण शिक्षक मतदारसंघातून ई. सी. निंगराजू यांना रिंगणात उतरविले आहे.

Advertisement
Tags :

.