जम्मू, कथुआ, सांबा, उधमपूरमध्ये भाजपचे वर्चस्व
24 पैकी 22 जागांवर मिळाला विजय
भाजपने जम्मू विभागाच्या मैदानी भागांमध्ये स्वत:चे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पक्षाने जम्मू, कथुआ, सांबा आणि उधमपूर जिल्ह्यातील 24 जागांपैकी 22 जागा जिंकल्या आहेत. जम्मू क्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपने प्रचार केला आहे. यामुळे या जिल्ह्यांमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्या आघाडीला खातेही उघडता आले नाही. काँग्रेसमधून बाहेर पडत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारे सतीश शर्मा हे जम्मू जिल्ह्यातील छंब मतदारसंघातून तर डॉ. रामेश्वर हे कथुआ जिल्ह्dयातील बनी मतदारसंघात विजयी झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जम्मू, कथुआ, सांबा आणि उधमपूर जिल्ह्यातील 21 पैकी 18 जागा भाजपने जिंकल्या होत्या. यावेळी परिसीमनानंतर तीन मतदारसंघ वाढल्यावर भाजपने 24 जागांपैकी केवळ 2 जागा गमावल्या आहेत. या दोन्ही जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
भाजपने यावेळी जम्मू क्षेत्रातील 43 जागांपैकी 29 जागा जिंकल्या आहेत. जम्मूतील राजौरी, पुंछ जिल्ह्यात तुलनेत भाजपची कामगिरी कमकुवत राहिली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना हे नौशेरा मतदारसंघात पराभूत झाले आहेत. पराभवानंतर रविंद्र रैना यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे काश्मीर विभागात एकही जागा न मिळाल्याने भाजपला सरकार स्थापन करता येणार नाही.भाजपने 2014 च्या तुलनेत यावेळी अधिक चांगली कामगिरी केली आहे. कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा हा परिणाम आहे. पक्षाने जम्मू, कथुआ, सांबा आणि उधमपूर जिल्ह्यातील 22 मतदारसंघ जिंकले आहेत. या जिल्ह्यांमधील रहिवाशांनी जम्मू-काश्मीरच्या विकास आणि समृद्धीसाठी मतदान केले आहे. आम्ही विधानसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन करून स्वत:च्या त्रुटी दूर करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू असे भाजपचे संघटन महामंत्री अशोक कौल यांनी म्हटले आहे.