भाजपकडून माझ्या विरोधात ‘प्रॉक्सी वॉरियर्स’ची फौज तैनात
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांचा आरोप
पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे की, त्यांनी गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तात्काळ त्यांच्या विरोधात सुरू झालेल्या वैयक्तिक टीका, समन्वित हल्ले आणि प्रायोजित अप्रचार मोहिमांमुळे भाजप सरकारची वाढती अस्वस्थता आणि भीती उघड झाली आहे. भाजपने आपल्याविरुद्ध ‘प्रॉक्सी वॉरियर्स’ची फौज तैनात केली आहे, असा आरोपही चोडणकर यांनी केला आहे. या हल्ल्यांमुळे आपण कमकुवत होत नाही. उलट आपला निर्धार अधिक मजबूत होतो. आपली बदनामी करण्याचा प्रत्येक प्रयत्न गोव्याच्या जनतेसाठी लढण्याची व सरकारच्या अपयशांचा पर्दाफाश करण्याची आपली बांधिलकी अधिक दृढ करतो. भाजप सरकारने आपल्या राजकीय विरोधकांवर हल्ले करण्यासाठी ‘प्रॉक्सी वॉरियर्स’ची फौज तैनात केली आहे, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. चोडणकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, काँग्रेस पक्षाला प्रत्येक स्तरावर बळकट करणे, पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र आणणे, भाजप सरकारला जाब विचारणे आणि जनतेविरोधी प्रत्येक निर्णयाचा पर्दाफाश करणे हेच आपले ध्येय आहे.