कोट्टायम मेडिकल कॉलेज दुर्घटनेवरून भाजप, काँग्रेसकडून निदर्शने
वीणा जॉर्ज यांच्या राजीनाम्याची मागणी
कोट्टायम :
केरळच्या कोट्टायम मेडिकल कॉलेजमध्ये इमारत कोसळल्याचे प्रकरण आता तापू लागले आहे. याप्रकरणी राज्यभरात शुक्रवारी काँग्रेस, भाजप या विरोधी पक्षांनी आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या विरोधात निदर्शने केली आहेत. वीणा जॉर्ज यांच्या राजीनाम्याची मागणी या पक्षांकडून करण्यात आली. कोट्टायम मेडिकल कॉलेजमधील एक इमारत कोसळल्याने 52 वर्षीय महिला बिंदू यांचा मृत्यू झाला होता, तर तीन जण जखमी झाले होते. राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम येथे भाजप आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी बॅरिकेडिंग केले होते. तर काँग्रेस आणि भारतीय युनियन मुस्लीम लीगच्या युवा संघटनेने देखील वीणा जॉर्ज यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत. पट्टणमथिट्टामध्ये युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य विभागाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत वीणा जॉर्ज यांच्या राजीनाम्याची मागणी केली.