For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपा, काँग्रेस, आपचे उमेदवार आज भरणार अर्ज

01:15 PM Mar 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपा  काँग्रेस  आपचे उमेदवार आज भरणार अर्ज
Advertisement

फोंडा पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

Advertisement

फोंडा : फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्व उमेदवार आज शेवटच्या दिवशी सोमवार दि. 23 रोजी अर्ज भरणार आहेत. भाजपातर्फे रितेश रवी नाईक, काँग्रेसतर्फे डॉ. केतन भाटीकर तर आम आदमी पक्षाचे गितेश नाईक या आतापर्यंत अधिकृतपणे जाहीर झालेल्या उमेदवारांचा त्यात समावेश असेल. फोंड्याचे दिवंगत आमदार तथा माजी कृषीमंत्री रवी नाईक यांचे निधन झाल्याने  ही पोटनिवडणूक होत आहे. 9 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे.

सर्व पक्षांच्या उमेवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी घरोघरी प्रचारावर जोर दिलेला आहे. शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असल्याने तिनही पक्षांचे उमेदवार घरोघरी फिऊन मतदारांशी संवाद साधताना दिसत होते. गोवा फॉरवर्ड, रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. शिवाय कुठलाच अपक्ष उमेदवारही आत्तापर्यंत पुढे आलेला नाही. त्यामुळे भाजपा, काँग्रेस आणि आप यांच्यात ही तिरंगी लढत होणाची शक्यता आहे.

Advertisement

आज सोमवारी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एकंदरीत चित्र स्पष्ट होणार आहे. फोंड्यातील समाजकार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने या पोटनिवडणुकीची रंगत वाढली असून ही लढत अटीतटीची होण्याची चिन्हे दिसतात. त्यामुळे केवळ फोंडा मतदारसंघच नव्हे संपूर्ण गोव्याचे लक्ष याकडे लागून राहिले आहे. भाजपाने रवी नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी देऊन 2022 च्या निवडणुकीत पहिल्यांदाच जिंकलेली ही जागा राखून ठेवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.

मागील निवडणुकीत अवघ्या काही मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या डॉ. भाटीकर यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनेही जोर लावलेला आहे. त्यासाठी मागील उमेदवार राजेश वेरेकर यांची नाराजी दूर करीत, त्यांना पक्षासाठी कार्य करण्यास राजी केले आहे. वेरेकर यांनी स्वत: आपण पक्षांच्या विजयासाठी भाटीकर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारकार्यात उतरणार असल्याचे जाहीररित्या सांगितले आहे. आपने कार्यालय खुले कऊन विविध माध्यमातून प्रचारकार्य सुऊ केले आहे.

रितेश नाईक यांना पूर्ण पाठिंबा

रितेश नाईक यांना भाजपातर्फे उमेदवारी जाहीर होताच पक्षाचे जुने व निष्ठावान कार्यकर्ते विश्वनाथ उर्फ अपूर्व दळवी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन घडवून आणल्याने प्रदेशाध्यक्षांसह मुख्यमंत्र्यांना त्याची दखल घ्यावी लागली होती. मात्र रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद बोलावून दळवी यांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षाचे उमेदवार रितेश नाईक यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. आपण कुठे कमी पडलो, ज्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळू शकली नाही, ही आपली व समर्थकांची मुख्य मागणी होती. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर आपले समाधान झाले आहे. आता आपण स्वत: सर्व समर्थकांसह रितेश नाईक यांच्या प्रचारकार्यात वावरणार असून पुन्हा एकदा फोंड्यात भाजपाचे कमळ फुलणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्यावर अन्याय झाल्याच्या भावनेने आपले समर्थक स्वयंस्फूर्तीने आपल्या निवासस्थानासमोर जमा झाले होते. त्याची आपल्याला आधी कुठलीच कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरणही दळवी यांनी दिले आहे.

-विश्वनाथ दळवी

Advertisement
Tags :

.