चंदीगडमध्ये फुलले कमळ
भाजपचे सौरभ जोशी महापौर : आप उमेदवाराचा केला पराभव
कोणत्या उमेदवाराला किती मते?
- भाजप उमेदवार सौरभ जोशी यांना 18 मते
- आम आदमी पक्षाच्या योगेश यांना 11 मते
- काँग्रेस उमेदवार गुरप्रीत गाबी यांना 7 मते
वृत्तसंस्था/चंदीगड
केंद्रशासित प्रदेश चंदीगडला नवा महापौर मिळाला आहे. भाजपचे सौरभ जोशी यांच्यावर चंदीगडच्या नगरसेवकांनी विश्वास दाखविला आहे. निवडणुकीत आम आदमी पक्षासोबतची आघाडी संपुष्टात आणत काँग्रेसनेही महापौरपदासाठी स्वत:चा उमेदवार उभा केला होता. भाजपकडे स्वत:च्या 18 नगरसेवकांचे संख्याबळ होते. भाजपला विजयापासून रोखण्यासाठी काँग्रेस आणि आप एकत्र येतील अशी अपेक्षा फोल ठरली आहे. भाजपच्या वतीने सौरभ जोशी, तर आम आदमी पक्षाच्या वतीने योगेश ढींगरा तर काँग्रेसच्या वतीने गुरप्रीत सिंह गाबी हे महापौरपदाचे उमेदवार होते.
चंदीगड महापालिकेच्या 35 सदस्यीय सभागृहात भाजपचे 18 नगरसेवक तर आम आदमी पक्षाचे 11 आणि काँग्रेसचे 6 नगरसेवक आहेत. चंदीगडच्या खासदारालाही 35 सदस्यीय सभागृहात सदस्य म्हणून मतदानाचा अधिकार आहे. काँग्रेसचे वर्तमान खासदार मनीष तिवारी यांनी स्वत:च्या पक्षाचे उमेदवार गुरप्रीत सिंह गाबी यांच्या समर्थनार्थ हात उंचावला होता. निवडणूक पूर्वीच्या गुप्त मतदानाच्या प्रथेऐवजी हात उंचावून करविण्यात आली. हात उंचावल्यावर नगरसेवकांनी आवाजाने पुष्टीही दिली. नामनिर्देशित नगरसेवक रमनीक सिंह बेदी यांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
भाजपचे जसमन सिंह वरिष्ठ उपमहापौर
भाजपचे जसमान सिंह हे वरिष्ठ उपमहापौर म्हणून निवडून आले आहेत. त्यांना 18 मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे वरिष्ठ उपमहापौर पदासाठीचे उमेदवार मुन्नवर खान यांना 11 मते मिळाली. तर महापौर निवडणुकीनंतर काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
सुमन शर्मा उपमहापौरपदी
भाजपच्या नगरसेविका सुमन शर्मा या उपमहापौर म्हणून निवडून आल्या असून त्यांना 18 मते मिळाली आहेत. सुमन निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षातून भाजपमध्ये दाखल झाल्या होत्या. आम आदमी पक्षाचे उमेदवार जसविंदर कौर यांना 11 मते मिळाली. तर काँग्रेसच्या निर्मला देवी यांना एकही मत मिळाले नाही.