भाजपने चंदिगडमध्ये दिवसाढवळ्या फसवणूक केली! चंदिगढ निवडणुकीनंतर अरविंद केजरीवालांचा आरोप
चंदिगड महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराने आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्या आघाच्या उमेदवाराचा पराभव केला. चंदिगड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसबरोबर आघाडी करून निवडणुकीमध्ये भाजपपेक्षा जास्त जागा मिळवल्या होत्या. या निकालानंतर भाजपने दिवसाढवळ्या फसवणूक केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
चंदीगड शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे मनोज सोनकर यांनी मंगळवारी आपचे कुलदीप कुमार यांचा पराभव केला. 'आप'ने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. 35 संख्या असलेल्या विधानसभेत आप- काँग्रेस आघाडीला भाजपपेक्षा जास्त मते होती.
आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार टिका केली. या निवडणुकीमध्ये फसवणूक झाली असल्याचा आरोप करताना ते म्हणाले," या निवडणुकीमध्ये भाजपने दिवसाढवळ्या फसवणूक केली आहे. भाजप महापौरपदाच्या निवडणुकीत एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाईल." असा आरोप त्यांनी केला.
चंदीगडच्या महापौरपदाच्या निवडणुका 18 जानेवारी रोजी होणार होत्या. मात्र, पीठासीन अधिकाऱ्याच्या आजारपणामुळे त्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने ३० जानेवारीला निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते.