For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची लवकरच घोषणा

12:35 PM Dec 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची लवकरच घोषणा
Advertisement

खासदार सदानंद शेट तानावडे यांची माहिती

Advertisement

पणजी : देशात आता सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने गोव्यातही दक्षिण व उत्तर गोवा जिह्यातून भाजपचे उमेदवार लवकरच घोषित करण्यात येणार आहेत. येत्या नवीन वर्षात म्हणजे जानेवारीत लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची शोधाशोध करण्यात येईल, अशी माहिती राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली. पणजी येथे भाजपच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तानावडे बोलत होते. तानावडे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूक अगदी जवळ आली आहे. भाजपने या निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. तरीही गोव्यातील उमेदवारांबाबत अजूनही निर्णय घेण्यात आला नव्हता. कारण केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वाने हिरवा कंदील दाखवल्यानंतरच उमेदवार जाहीर होणार आहेत. तरीही येत्या जानेवारी महिन्यात उमेदवारांची शोधाशोध करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. उमेदवार निवडणुकीचे अधिकार हे केंद्रीय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याने त्यावर आताच भाष्य करणे योग्य नसल्याचे सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना सांगितले. भाजपने 2024 ची निवडणूकही गांभीर्याने घेतली असून, या निवडणुकीत भाजपला यश मिळविण्यासाठी आम्हाला प्रत्येक जागा महत्त्वाची आहे आणि त्यादृष्टीनेच उमेदवार निवडले जातील, असे ते म्हणाले. पोर्तुगीज नागरिकत्व या विषयावर बोलताना तानावडे म्हणाले, राज्यातील काही नागरिकांची गोव्यात व पोर्तुगालमध्येही नोंदणी असल्याचे दिसून आले आहे.  काहीजण तशी नोंदणी करण्यासही इच्छुक आहेत. परंतु राज्यात किंवा पोर्तुगाल या ठिकाणी केवळ एकच नोंदणी असावी, असे आपले मत असल्याचे ते म्हणाले.

जुन्यानाच की नव्याना संधी ?

Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीमध्ये उमेदवारांची शोधाशोध करण्यास प्रारंभ करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी नव्या की जुन्याच नेत्यांना संधी देणार याबाबत मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे उत्तरेतून पुन्हा श्रीपाद नाईक की गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांना संधी मिळणार, हे आताच सांगणे कठीण बनले आहे. दक्षिणेत माजी खासदार नरेंद्र सावईकर यांना उमेदवारी न दिल्यास दामोदर नाईक, बाबू कवळेकर किंवा दिगंबर कामत यांच्यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.