विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी भाजपकडून सुरु
मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्षांचा दिल्ली दौरा
पणजी : गोव्यातील विधानसभा निवडणुका जवळ येत असून त्याची तयारी तसेच संघटनात्मक काम वाढवण्याच्या हेतूने विविध कार्यक्रम आखण्यात येणार आहेत. त्यासाठी भाजपचे केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय नेते गोव्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी नुकताच दिल्ली दौरा करून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली आणि गोव्यातील आगामी निवडणुकीबाबत चर्चा केली. राज्यातील निवडणूक आणि राजकीय वातावरण तापवण्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी केली असून केंद्रातील भाजपचे प्रमुख नेते, पुढारी यांना गोव्यात प्रचारासाठी पाठवावे अशी मागणी नबीन यांच्याकडे करण्यात आली आहे. त्या मागणीनुसार नेत्यांना गोव्यात पाठवण्याचे आश्वासन नबीन यांनी दिल्याचे सांगण्यात आले. निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने प्रचारात मुसंडी मारण्याचे निश्चित केले असून सभा, बैठका, मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना उत्साहित व सक्रिय करण्यावर भर देण्याचे ठरवले आहे. गोव्यात आता पावसाळादेखील जवळ आला असून तो संपल्यानंतरच प्रचाराचा धुमधडाका सुरू करण्याचा बेत भाजपने आखला आहे. प्रचाराचे नियोजन आणि त्याची पूर्वतयारी भाजपने आतापासूनच सुरू केली असून त्यांची दिल्ली भेट त्यासाठीच होती असे, सुत्रांनी नमूद केले.