पित्रोदांच्या दाव्यावर भाजपचा प्रहार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी भविष्यात पंतप्रधान होणार, अशा सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार प्रहार केला आहे. पित्रोदा यांना राहुल गांधींमध्ये पंतप्रधानांची प्रतिमा खरंच दिसत असेल तर आधी त्यांना बोलायला शिकवा, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताची चेष्टा करतात. ते विदेशात जाऊन इथल्या लोकशाहीवर, माध्यमांवर आणि न्यायव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे पित्रोदा यांनी त्यांना कधी आणि कुठे बोलावे, कसे बोलावे याचा गृहपाठ शिकवावा, असेही प्रसाद पुढे म्हणाले. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी बुधवारी एका मुलाखतीमध्ये राहुल गांधी हे राजीव गांधींपेक्षा जास्त बुद्धिमान असल्याचे म्हटले होते. हुशार असण्यासोबतच ते एक उत्तम रणनीतीकार देखील आहेत. राहुल गांधी यांच्यामध्ये भावी पंतप्रधानपदाचे सर्व गुण असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या स्तुतीसुमनांमुळे भाजपने पित्रोदा यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.