For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यूपी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा डाव; विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी, गुजरात-पंजाबची कमान कुणाकडे?

11:46 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
यूपी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा डाव  विनोद तावडे यांच्याकडे जबाबदारी  गुजरात पंजाबची कमान कुणाकडे
Advertisement

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा संघटनात्मक बदल केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी मंगळवारी विविध राज्यांच्या प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती जाहीर केली. विशेषतः 2027 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Advertisement

भाजपने तावडे यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून जगदीश ईश्वरभाई पटेल यांना सहप्रभारी करण्यात आले आहे. तसेच पंजाबची जबाबदारी सतीश पुनिया यांच्याकडे, तर गुजरातचे प्रभारीपद तरुण चुघ यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशची धुरा विनोद तावडेंकडे

2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम करण्याचा अनुभव असलेले तावडे हे निवडणूक रणनीती आणि संघटनात्मक व्यवस्थापनासाठी ओळखले जातात.

Advertisement

महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी नेते असलेल्या तावडे यांनी भाजपच्या संघटनात्मक विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बूथ पातळीपासून ते निवडणूक व्यवस्थापनापर्यंतचा त्यांचा अनुभव लक्षात घेऊन पक्षाने उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

जगदीश पटेल उत्तर प्रदेशचे सहप्रभारी

गुजरातचे वरिष्ठ भाजप नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय मंत्री जगदीश ईश्वरभाई पटेल यांची उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पटेल यांना गुजरातमधील संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील बूथ पातळीवरील पक्ष संघटना मजबूत करण्यामध्ये त्यांनी भूमिका बजावली आहे. त्यामुळे तावडे यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे.

पंजाबची जबाबदारी सतीश पुनियांकडे

भाजपने पंजाबसाठी सतीश पुनिया यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने पंजाबमध्ये पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

गुजरातची कमान तरुण चुघ यांच्याकडे

भाजपचे राष्ट्रीय महामंत्री आणि राष्ट्रीय कार्यालय प्रभारी तरुण चुघ यांच्याकडे गुजरातची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पंजाबशी संबंध असलेले चुघ सध्या मध्य प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत.

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गुजरातची प्रभारी म्हणून नियुक्ती करून पक्षाने त्यांच्यावर मोठा संघटनात्मक विश्वास दाखवला आहे.

2027 च्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी

उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाब या राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक पातळीवर हालचाली वाढवल्या आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशात विनोद तावडे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला प्रभारीपद देऊन पक्षाने 2027 च्या निवडणुकीसाठी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.

Advertisement

.