For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवार जाहीर

06:41 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवार जाहीर
Advertisement

8 राज्यांमध्ये होणार राज्यसभा पोटनिवडणूक

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भाजपने 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या 8 राज्यांमधील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी 9 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने राजस्थानमधून केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टु तर मध्यप्रदेशातून जॉर्ज कुरियन यांना पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. सत्तारुढ पक्षाने बिहारमधील जागेसाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांना संधी दिली आहे. ओडिशातून ममता मोहंता तर त्रिपुरामध्ये राजीव भट्टाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Advertisement

भाजपने बिहारच्या दुसऱ्या राज्यसभा जागेसाठी वरिष्ठ वकील मनन कुमार मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. मिश्रा हे बिहारच्या गोपालगंज जिल्ह्याचे रहिवासी आहेत. मिश्रा यांनी पाटणा विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.

राज्य                 उमेदवार

आसाम             मिशन रंजन दास

आसाम             रामेश्वर तेली

बिहार                मनन कुमार मिश्रा

हरियाणा                   किरण चौधरी

मध्यप्रदेश                जॉर्ज कुरियन

महाराष्ट्र                   धैर्यशील पाटील

ओडिशा                    ममता मोहंता

राजस्थान                रवनीत सिंह बिट्टू

त्रिपुरा                राजीव भट्टाचार्य

रंजन दास अन् रामेश्वर तेली कोण?

आसामध्ये रंजन दास आणि रामेश्वर तेली यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. तेली हे माजी खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये ते लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांना केंद्रात राज्यमंत्रिपद मिळाले होते. तर मिशन रंजन दास हे माजी आमदार आहेत.

हरियाणात किरण चौधरींना संधी

हरियाणातून भाजपने किरण चौधरी यांना उमेदवारी दिली. जाट समुदायाशी संबंधित चौधरी माजी मंत्री आहेत. दीपेंद्र हु•ा हे रोहतकचे खासदार म्हणून निवडून आल्याने त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. याचमुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

मध्यप्रदेशातून मैदानात कुरियन

मध्यप्रदेशातील राज्यसभा जागेसाठी भाजपने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांना उमेदवारी दिली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. कुरियन हे बिनविरोध निवडून येणार हे निश्चित मानले जात आहे.

धैर्यशील पाटील

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी भाजपने धैर्यशील पाटील यांना उमेदवारी दिली आहे. रायगडमधील ते भाजप नेते आहेत. पाटील हे यापूर्वी शेकापमध्ये कार्यरत होते.

ममता मोहंता

भाजपने ओडिशातील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी ममता मोहंता यांना उमेदवारी दिली आहे. मोहंता यापूर्वी बीजदच्या राज्यसभा खासदार होत्या. 1 ऑगस्ट रोजी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. ममता मोहंता या कुडुमी समुदायाच्या प्रमुख नेत्या म्हणून ओळखल्या जातात.

रवनीत सिंह बिट्टू

राजस्थानातून भाजपने केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना मैदानात उतरविले आहे. लोकसभा निवडणुकीत बिट्टू हे लुधियाना मतदारसंघात पराभूत झाले होते. माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांचे नातू बिट्टू हे 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते.

त्रिपुरा भाजप अध्यक्ष भट्टाचार्य

राजीव भट्टाचार्य हे त्रिपुरा भाजपचे अध्यक्ष असून पक्षाने त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. विप्लव देव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेकरता तेथे पोटनिवडणूक होणार आहे.

Advertisement
Tags :

.