For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फायनलचा चषक! सत्ताधाऱ्यांची सरशी

06:56 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
फायनलचा चषक  सत्ताधाऱ्यांची सरशी
Advertisement

पाच राज्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाची झालेली प्रचंड सरशी म्हणजे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेमीफायनल जिंकली असा घेतला जातो आहे व तो वास्तवाला धरुन आहे. भाजपा व मोदी फायनल म्हणजे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेची पंचवार्षिक निवडणूक जिंकणार आणि सलग तिसरी टर्म सत्ताप्राप्ती साधत पंतप्रधान होणार असे मानले जाते आहे. भाजपा व मित्रपक्षात मोदी की गॅरंटी मानली जात आहे. पण काँग्रेस व मोदी विरोधक पराभव झाला असला तरी फायनलचा चषक आम्ही जिंकणार असे सांगत आहेत.

Advertisement

भारतीय क्रिकेट संघाने नुकत्याच झालेल्या विश्वचषक सामन्यात सेमी फायनल पर्यंतचे सर्व सामने जिंकले पण फायनलचा सामना व चषक गमावला तेच उदाहरण दिले जाते आहे. पण क्रिकेट वेगळे आणि राजकारण वेगळे दोन्हीतही तयारी, डावपेच, सराव आणि रणनिती लागते. क्रिकेटमध्ये राजकारण असते आणि राजकारणात खेळा केला जातो. तथापि लिटमस टेस्ट ही अचूक असते. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपाने मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथे स्पष्ट बहुमत आणि तेलंगणा व मिझोराममध्ये भाजपाला चांगले मतदान झाले आहे. तेलंगणात काँग्रेसने बी.आर.एस चा दारुण पराभव करत तेथे रेवंथ रे•ाrच्या नेतृत्वाखाली सरकार देणार असे स्पष्ट केले आहे. मिझोराममध्ये स्थानिक प्रादेशिक पक्ष सत्तारुढ होणार आहे. वरवरचा निकाल आणि सखोल चिंतन सत्ताप्राप्तीनंतर सत्तावाटप व सोशल इंजिनिअरिंग कसे होते. यावरच या लिटमस टेस्टचे भवितव्य अवलंबून असते आणि कर्नाटकातील पराभवानंतर मोदी-शहा जोडीने आणि भाजपा पक्षाने केलेली सुधारणा त्यांना फायदेशीर ठरली आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, बी.आर.एस. सह विविध पक्षांनी अक्षरश: आश्वासनांची खैरात केली आहे. वीज बिलापासून मोफत प्रवास आणि मुलीला लग्नात एक तोळा सोने, सिलिंडर निम्या किमतीत अशा अनेक आश्वासनांची खैरात झाली. भाजपानेही काही आश्वासने दिली आहेत. आता मुख्यमंत्री कोण होणार आणि आश्वासनांची अंमलबजावणी कशी होणार, राजी-नाराजी कुणाकुणाची होणार यावर फायनलचे यश अवलंबून आहे. देशाच्या नकाशावर लक्ष दिले तर उत्तर भारतात हिंदी पट्ट्यात काँग्रेस सुफडासाफ झाली आहे. दक्षिणेत मात्र प्रादेशिक पक्ष व काँग्रेस सत्तेत आहेत. भाजपाचे शतप्रतिशत भाजपा हे लक्ष पूर्ण झालेले नाही. देशात 16 राज्यांत भाजपाचे आणि पाच राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. भाजपाची बारा राज्यात स्वबळावर सत्ता आहे तेथे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रासह चार राज्यात भाजप अन्य पक्षासोबत सत्तेत आहे. बिहार, झारखंड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, तेलंगणात भाजपाला सत्ता मिळवता आलेली नाही. मिळालेली सत्ता राखणे व अन्य राज्यात पक्ष मजबुत करत शतप्रतिशत भाजपा हे उद्दिष्ट साध्य करणे सोपे नाही पण राहुल गांधी सारखे विरोधक असतील तर फारसे अवघडही नाही. देश, देशहीत आणि विकास हेच ध्येय घेवून रात्रीचा दिवस करणारे मोदी मतदारांना प्रिय आहेत असे आजवरच्या निकालवरुन दिसते आहे. पण लोकशाहीत काहीही चमत्कार होवू शकतात पाच राज्याच्या निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात दिवाळी साजरी झाली आहे. निर्देशांक सार्वकालीन उंचीवर गेले आहेत. विदेशी व देशी निवेशक मोठ्या रकमा भारतीय बाजारात गुंतवत आहेत. सरकारी बँका यांचेही समभाग चढ्या भावावर स्वार आहेत. हे बदलाचे वारे आहे. कर्नाटकातील भाजपाचा पराभव आणि अनेक छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्र येवून साकारलेली इंडिया आघाडी या निकालाला कसा प्रतिसाद देते हे बघावे लागेल. पण या आघाडीत आणि आघाडीतील काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात येईल असे दिसते आहे. शरद पवार काय करतात ते बघायचे पण अजित पवारांनी भाजपाला साथ देताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही असे म्हटले होते. एकनाथ शिंदे यांनीही ‘मोदी की गॅरंटी’ अधोरेखीत करत आपण भाजपा सोबत आहोत असे सिध्द केले आहे. भाजपातही ‘मी पुन्हा येणार’चा दुसरा अंक सुरु झाला आहे. भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘ते पुन्हा येणार’ म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा आगामी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे. अजित पवार समर्थकही अजितदादा मुख्यमंत्री होणार असे जाहीर सांगत आहेत. भाजपाला मुंबई महापालिका महाराष्ट्रासह दक्षिणेत चांगले यश मिळवायचे आहे. त्यासाठी जोर लावला जाईल. छोटे छोटे प्रादेशिक पक्ष, जाती-धर्मांच्या संघटना आणि लहान मोठी घराणी या झंझावातात कितपत टिकणार आहे  हे बघावे लागेल.  आता संसदेचे आणि महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होईल तेथे भाजपा विजयाचे लाडू वाटले जातील. कदाचित राज्यात एक जानेवारीनंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल. इंडिया आघाडीत अंतर्गत धुसफुस व भाजपाच्या दिशेने वाहत असलेले विजयाचे वारे पहाता पुन्हा भाजपात मेगाभरती होऊ शकते. पाठीराखे आमदार-खासदार सोडून गेलेले शरद पवार आणि उद्धव ठाकरे आता कोणती चाल खेळतात हे बघावे लागेल. जरांगे पाटील यांच्या सभा व मराठा आरक्षण हे विषय व महाराष्ट्रातील जातीय, धार्मिक सलोखा हा विषयही ऐरणीवर आहे. त्यांचे पडसाद संसदेत विधानभवनात दिसतील. राहूल गांधी दरवर्षी प्रमाणे ख्रिसमस सुट्टीवर जातात यंदा ते काय करतात हे बघायचे. पण मोदींना केवळ पनवती, मौत का सौदागर म्हणून निवडणूक जिंकता येणार नाही. कामातून उत्तर द्यावे लागेल हे वेगळे सांगायला नको. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, अखिलेश यादव आणि आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनाही पक्षसंघात आघाडी व रणनिती या संदर्भाने फेरविचार करावा लागेल. तर मोदी की गॅरंटीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन  त्याला तोडीस तोड उत्तर शोधावे लागेल. तुर्त भाजपाने पाच राज्यांच्या निवडणुकांत सेमीफायनल जिंकली आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची फायनलसाठी तयारी आरंभली आहे. स्वस्ताई आणि नोकऱ्या हे कळीचे मुद्दे आहेत. त्यावर कोण कशी भूमिका घेतो यावर फायनलचा चषक कोण जिंकेल हे ठरेल.

Advertisement
Advertisement
Tags :

.