For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण गोवा जि. पं. अध्यक्षपदासाठी भाजप-काँग्रेस उमेदवारांचे अर्ज

11:36 AM Dec 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण गोवा जि  पं  अध्यक्षपदासाठी भाजप काँग्रेस उमेदवारांचे अर्ज
Advertisement

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी आज मंगळवार दि. 30 रोजी निवडणूक होत असून अध्यक्षपदासाठी भाजप-मगो युतीचे उमेदवार म्हणून सिद्धार्थ गावस देसाई तर काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे उमेदवार म्हणून लुईझा रॉड्रिग्ज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून अंजली अर्जुन वेळीप आणि गोवा फॉरवर्डतर्फे इनासिना पिंटो यांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस-गोवा फॉरवर्डकडे आवश्यक संख्याबळ नसतानादेखील त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून आज होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

राज्यात 20 डिसेंबर रोजी झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल 22 डिसेंबरला जाहीर झाला. दक्षिण गोव्यात 25 पैकी 11 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दुसरीकडे, काँग्रेसने 8 आणि गोवा फॉरवर्डने 1 अशा एकूण 9 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने युतीचा घटक असलेल्या मगो (3 जागा) आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. काल सोमवारी सकाळी सिद्धार्थ देसाई व अंजली वेळीप यांनी अर्ज भरले. यावेळी माजी खासदार विनय तेंडुलकर व शर्मद रायतूरकर तसेच भाजप-मगो युतीचे जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते.

सहजासहजी निवडणूक जिंकू देणार नाही

Advertisement

निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी 3 आणि उपाध्यक्षपदासाठी 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीच्या उमेदवारांनी अर्ज भरताना काँग्रेसचे दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सावियो डिसिल्वा उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, जरी संख्याबळ कमी असले तरी भाजपला ही निवडणूक सहजासहजी जिंकू देणार नाही, या उद्देशाने काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड युतीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मात्र, एकूण चित्र आज होणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.