'पुणे पदवीधर 'वर भाजपचाही दावा; राष्ट्रवादीसोबत घमासान होण्याची शक्यता, दोन्ही पक्षांकडून जोरदार हालचाली
पुणे: विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय वर्तुळात इच्छुकांनी हालचाली तीव्र केल्या आहेत. सध्या हा मतदारसंघ महायुतीतील अजित पवार पक्षाच्या ताब्यात असला, तरी भाजपने या जागेवर पुन्हा दावा सांगत निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले असल्याने भाजपसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीतील दोन प्रमुख मित्रपक्ष म्हणजेच भाजप आणि 'राष्ट्रवादी' आमनेसामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून उमेदवारीवरून महायुतीतच चुरस पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच पश्चिमेकडील जिल्ह्यांचा समावेश होतो.
२०२० मधील निवडणुकीत तत्कालीन महाविकास आघाडीतील (राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस) संयुक्त ताकदीच्या जोरावर राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपने मोठी व्यूहरचना आखली आहे. दुसरीकडे राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाला असून विद्यमान आमदार अरुण लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले, तरी त्यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे व ते भाजपकडून उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. तर 'राष्ट्रवादी कडून कोल्हापूरचे प्रदीप उर्फ भय्या माने यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
हा मतदारसंघ आपल्याकडेच राखण्यासाठी आणि भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही बैठकांचा धडाका सुरू आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मतदार नोंदणी मोहीम वेगाने राबवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. तर दुसरीकडे भाजपने हा मतदारसंघ जिंकण्यासाठी विशेष रणनीती आखली असून पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्यावर 'मतदार नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आढावा बैठक घेऊन भाजपची सत्ता असलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेवकांना मतदार नोंदणीचे थेट उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेतील प्रत्येक नगरसेवकाला किमान १५००, तर पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवकाला किमान ५०० पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेला हा जोरदार प्रचार आणि मतदार नोंदणीचा धडाका पाहता आगामी पुणे पदवीधर मतदारसंघातील लढत अटीतटीची ठरण्याची चिन्हे आहेत.