तामिळनाडूत भाजप-अद्रमुक युती
2026 ची विधानसभा निवडणुकीत एकत्र येणार
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अखिल भारतीय अण्णाद्रमुक यांच्यात युतीची घोषणा झाली आहे. हे दोन्ही पक्ष आणि इतर छोटे स्थानिक पक्ष मिळून 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला समोरे जाणार आहेत. युतीचे नेतृत्व अद्रमुक नेते ई. पलानीस्वामी हे करणार आहेत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे शुक्रवारी केली आहे. ही निवडणूक जिंकण्याचा आमचा निर्धार असून आम्ही यशस्वी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1998 पासून अद्रमुक पक्ष हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा एक भवशाचा पक्ष आहे. मधल्या काळात काही मतभेदांमुळे दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले होते. तथापि, त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांना फटका बसला. तर द्रमुक पक्षाला विरोधी पक्षांच्या फुटीचा लाभ मिळाला. यावेळी आम्ही आमच्या विरोधकांना अशी संधी देणार नाही. राज्यातील वातावरण विरोधी पक्षांच्या युतीला अनुकूल असून आम्ही निश्चितपणे यशस्वी कामगिरी करणार आहोत. सत्ताधारी द्रमुक पक्ष भ्रष्टाचाराने पोखरला असून त्याने राज्याची प्रचंड हानी केली आहे. त्यामुळे राज्याच्या हितासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या निर्णयाला जनतेची मान्यता निश्चित मिळेल, असे प्रतिपादन शहा यांनी केले.
पलानीस्वामी नेते
युतीचे नेतृत्व एडापल्ली पलानीस्वामी यांच्याकडे राहणार आहे. आमच्या युतीचा विजय झाल्यानंतर तेच राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला भक्कम बहुमत मिळेल. राज्यातील जनता द्रमुकच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली असून तिला परिवर्तन हवे आहे. जनतेच्या मनातील हे परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे, अशी मांडणी त्यांनी केली.
जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न
सत्ताधारी द्रमुक त्याच्या फुटीरतावादी कार्यक्रमाच्या आधारावर जनतेला भ्रमित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्रिभाषा सूत्र, मतदारसंघांचे परिसीमन यांच्यासारख्या निरर्थक मुद्द्यांमध्ये लोकांना अडकवून भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि कुव्यवस्थापन यांच्यासारख्या मूळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न हा पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष करीत आहेत. तथापि, ते यशस्वी होणार नाहीत. मतदार सूज्ञ असून तो हे डावपेच ओळखतो, असेही अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.