खानापुरात वक्फ कायद्याविरोधात भाजपचे आंदोलन
शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डला देण्याचा घाट : कायदा मागे घेऊन उताऱ्यावरील नावे रद्द करा : तहसीलदारांना निवेदन
खानापूर : खानापूर तालुका भाजपच्यावतीने काँग्रेस सरकारच्या विरोधात वक्प कायद्यात दुरुस्ती तसेच शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर वक्फ बोर्डाचे नाव दाखल झालेल्या विरोधात मोर्चा काढून तहसीलदाराना निवेदन देण्यात आले. तसेच तातडीने कायदा मागे घ्यावा आणि उताऱ्यावर दाखल झालेली नाव रद्द करावीत, अशा आशयाचे निवेदन यावेळी देण्यात आले. लक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सुरवात केली. तहसीलदार कार्यालयात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मल्लाप्पा मारिहाळ यांनी प्रास्ताविक करून वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर वक्फ बोर्डाचे नाव दाखल होत असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काँग्रेस सरकार शेतकऱ्यांची जमीन वक्फ बोर्डला देण्याचा घाट घालत असल्याचे सांगितले.
आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, काँग्रेस सरकार व्होट बँकच्या नादात हिंदू समाजावर अन्याय करत असून, मठ मंदिर आणि शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या स्वाधीन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उताऱ्यातील 9 आणि 11 कॉलममध्ये शेतकऱ्यांची नावे कमी होऊन वक्फ बोर्डाची नावे दाखल होत आहेत. अशा घटना खानापूर तालुक्यातही घडत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यासाठी सरकारने तातडीने हा कायदा मागे घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून वक्फ बोर्डला देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा याचे परिणाम काँग्रेस सरकारला भोगावे लागतील. माजी आमदार अरविंद पाटील म्हणाले, काँग्रेस सरकार शेतकऱ्यावर अन्याय करत असून भविष्यात याचे दुरागामी परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी जागरुत राहणे गरजेचे आहे. अॅड चेतन मणेरीकर म्हणाले,
काँग्रेस सरकारने वेळोवेळी वक्फ बोर्डच्या कायद्यात दुरुस्ती करून विशिष्ट समाजाला फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. नव्या कायद्यानुसार शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डला देण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तातडीने कायदा मागे घेऊन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, सिद्धरामय्या सरकारने अल्पसंख्याकाना खूष करण्यासाठी हिंदूविरोधी निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या जमिनी वक्फ बोर्डला देण्याचे कटकारस्थान सुरू आहे. जिल्हा युवा मोर्चा सेक्रेटरी पंडित ओगले म्हणाले, काँग्रेस सरकार कायमच हिंदू विरोधी भूमिका घेत आहेत. याची प्रचिती वक्फ बोर्डच्या कायद्यामुळे स्पष्ट झाले आहे. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जागरुक राहून या कायद्याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे. यावेळी बाबूराव देसाई, लक्ष्मण झांजरे, नंदकुमार निट्टूरकर, बसवराज सानिकोप यांची भाषणे झाली.
मालमत्तेवरुन शेतकऱ्यांची नावे कमी करून वक्फ बोर्डचे नाव दाखल करण्याचा घाट
वक्फ बोर्डाच्या कायद्यानुसार राज्यातील जमिनीच्या मालमत्तेवरुन शेतकऱ्यांची नावे कमी करून त्या ठिकाणी वक्फ बोर्डचे नाव दाखल करण्यात येत आहे. या विरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलन सोमवारी हाती घेतले होते. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर भाजपतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी मंदिरापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी वक्फ बोर्डच्या विरोधात तसेच काँग्रेस सरकारच्या विरोधात फलक घेऊन मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते.
राज्य शासनाकडे निवेदन पाठविण्याचे आश्वासन
राजा छत्रपती चौकात मानवी साखली करून कायद्याचा निषेध करण्यात आला. यानंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्वीकार करुन आपण निवेदन राज्य सरकारकडे पाठवून देण्याचे आश्वासन दिले.